एकनाथ शिंदे हे महेश शिंदेंबाबत योग्य वेळी निर्णय घेणार, संजय शिरसाटांचा दावा

सातारा : आमदार महेश शिंदेंबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्यवेळी निर्णय घेतील असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं. महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला हाताशी धरून जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांना परिस्थितीची आधीच माहिती दिली होती, त्यांनी बोलावल्यास त्यांना भेटायला जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार महेश शिंदे यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जो प्रकार केला आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नव्हता. त्या प्रकारानंतर आमदार शिंदे यांना समजही देण्यात आली होती. तरीही त्यांचं स्टेटमेंट देणं काही बदलेलं नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यावर लवकर निर्णय घेतील असा दावा संजय शिरसाटांनी केला.

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला बोलावतील, त्या दिवशी मी नक्की जाणार. माझी भूमिका मी त्यांच्यासमोर आधीही मांडली आहे आणि आताही मांडू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला डायरेक्ट फोन करतील.”

Mahesh Shinde On Sanjay Shirsat : संजय शिरसाटांशी चर्चा करणार

संजय शिरसाट आपले चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपण एकत्रित काम केलंय. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्यासोबत एकत्रित बसून चर्चा करणार असंही महेश शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, या सर्व घडामोडींवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देणं टाळत ‘नो कमेंट’ म्हणणंच पसंत केलं.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं दिसतंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीने 35 जागा जिंकत बहुमत मिळवलं. तर भाजपला 27 जागा मिळाल्या.

शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे भाजपने त्यांनाच अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढे केलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असतानाही भाजपने त्यांचे सहा सदस्य फोडत अध्यक्षपदी प्रिया शिंदे यांना बसवलं.

अध्यक्षपदाच्या या निवडणुकीमध्ये पोलीस आणि पालकमंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील यांना दुखापतही झाली. हा प्रश्न शंभुराज देसाई यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

या सगळ्या घडामोडींनंतर, शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आमदार महेश शिंदे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.