राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ससाठी मोठी खुशखबर; मॅच विनर खेळाडूचे पुनरागमन
पंजाब किंग्सचा संघ या हंगामात अप्रतिम कामगिरी करत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने या मोसमात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता या संघाचा पुढचा मुकाबला राजस्थान रॉयल्ससारख्या मजबूत संघाविरुद्ध आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा एक स्टार वेगवान गोलंदाज आता स्क्वॉ़डमध्ये सामील झाला आहे. वैयक्तिक कारणांमुळे हा गोलंदाज आतापर्यंत या हंगामात खेळू शकला नव्हता. अशा परिस्थितीत, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा संघ त्याला ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघात सामील झाला आहे. फर्ग्युसन आयपीएल २०२६ च्या पहिल्या ७ सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या येण्याने संघाच्या वेगवान गोलंदाजीची बाजू अधिक भक्कम होणार आहे. २०२५ मध्ये तो या संघाशी जोडला गेला होता, परंतु गेल्या हंगामात त्याला केवळ ४ सामने खेळायला मिळाले होते, ज्यामध्ये त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये तो आतापर्यंत ५ वेगवेगळ्या संघांकडून खेळला असून त्याने ५१ विकेट्स पटकावल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ८.९७ राहिला आहे.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी पंजाब किंग्स आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. लॉकी फर्ग्युसन संघात परतल्यामुळे, एका वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल. बार्टलेटच्या जागी फर्ग्युसनला संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. हा या हंगामातील त्याचा पहिला सामना असू शकतो.
Comments are closed.