डील करा, अन्यथा विनाश अटळ; ट्रम्प यांचा पुन्हा इराणला इशारा
अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या शस्त्रसंधी असली तरी दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघडपणे इशारा दिला आहे की, जर दोन्ही देशांत ठोस डील झाली नाही तर इराणवर पुन्हा भीषण हल्ले होऊ शकतात.
इराणचा अणू कार्यक्रम, होर्मुज सामुद्रधुनीतील नाकेबंदी आणि भविष्यातील सुरक्षेची हमी या तीन प्रमुख मुद्द्यांवरून दोन्ही देशांत मोठा वाद निर्माण झाला असून, यामुळे पुन्हा एकदा युद्धाची शक्यता बळावली आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ८ एप्रिलपासून संघर्ष थांबलेला असला तरी कराराच्या अटींवरून दोन्ही देशांत अद्याप सहमती होऊ शकलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, इराण आता पूर्वीसारखा शक्तिशाली राहिलेला नाही आणि ते पूर्णपणे कमकुवत झाले आहेत. इराणला आता डीलसाठी भाग पाडले जाईल आणि जर त्यांनी काही चुकीचे पाऊल उचलले, तर लष्करी कारवाईचा पर्याय अमेरिकेने खुला ठेवला आहे.
ट्रम्प म्हणाले, इराणला सध्या त्यांचा नेता कोण आहे हे देखील समजणे कठीण झाले असून ते पूर्णपणे हतबल झाले आहेत. दरम्यान, होर्मुजमधील अमेरिकन नाकेबंदीमुळे इराणची आर्थिक कोंडी झाली असून प्रचंड तेल उत्पादन होत असूनही इराणला ते विकता येत नाहीये. ज्याचा फटका चीनसारख्या ग्राहक देशांनाही बसत आहे.
Comments are closed.