सुंदर बसस्थानक राज्यस्तरीय स्पर्धेत माखजन बसस्थानकाचा द्वितीय क्रमांक
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेत माखजन बसस्थानकाने ‘क’ गटात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे विभागातील बसस्थानकांमधून माखजनची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
एकेकाळी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, जीर्ण इमारत, बंद उपहारगृह, अपुरा प्रकाश आणि इतर विविध समस्यांनी ग्रासलेल्या माखजन बस स्थानकाचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कायापालट करण्यात आला. या बदलामध्ये माखजन ग्रामपंचायतीने पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
सरपंच महेश बाष्टे, उपसरपंच पूजा डेरे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून बसस्थानकाच्या विविध सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणल्या. प्रवासी वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पाडळकर यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले. सध्या बसस्थानक परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी केलेली इमारत, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छ प्रसाधनगृहे, सुरू असलेले उपहारगृह आणि व्यवस्थित प्रवासी सुविधा उपलब्ध असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
देवरुख आगाराच्या अखत्यारीतील माखजन बसस्थानकाचा १ जून रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयात सन्मान करण्यात येणार आहे. या यशाबद्दल ग्रामस्थ, प्रवासी आणि विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.