गडचिरोलीत नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद
सलग तीन बळी घेणाऱया नरभक्षक तीन वर्षांच्या वाघिणीला गडचिरोलीच्या वनविभागाच्या पथकाने आज पहाटे 3 वाजता बेशुद्ध करून पकडण्यात यश मिळाले. त्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात धास्तावलेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे ‘जी-25 एसएएफ’ अशी ओळख असलेल्या या वाघिणीला पकडल्यानंतर कासनसूर वनपरिक्षेत्र कार्यालयात हलविण्यात आले.
जारावंडी परिसरात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांनी गेल्या काही महिन्यांपासून चिंतेचे वातावरण होते. 17 ऑगस्ट रोजी डोलंदा येथील 57 वर्षीय शेतकरी हरी वड्डे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी इरपनपायली येथील 70 वर्षीय बिलाशी आनंद बा यांना धान कापणीसाठी शेतात गेल्या असताना वाघाने ठार केले. या घटनांनंतरही हल्ल्यांचे सत्र थांबले नाही. 2 नोव्हेंबर रोजी दिंडवी येथील 68 वर्षीय सदाशिव दुग्गा यांचा बैल चारत असताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या तिन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तिसऱया घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱयांना जाब विचारत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
Comments are closed.