भुजबळांची मंत्रीमंडळात एन्ट्री, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी चुरस वाढली? माणिकराव कोकाटे म्हणाले
छगन भुजबळ वर मणक्राव कोकेटे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी (दि. 20) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला चौथे मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे (Dada Bhuse), राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना मंत्रिपद मिळाले होते. आता छगन भुजबळ यांच्या शपथविधीनंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी (Nashik Guardian Minister) नवे राजकारण तापू लागले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या पदावर याआधी दावा केला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan), शिवसेनेतून दादा भुसे आणि राष्ट्रवादीतून माणिकराव कोकाटे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आता छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात आगमन झाल्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा पालकमंत्रीपदासाठी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, भुजबळ यांचे मंत्रिमंडळात स्वागत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सर्व समावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे. ओबीसी चेहरा असावा, असं त्यांना आधीपासूनच वाटत होतं. पालकमंत्रीपदासाठी चुरस वगैरे मी मानत नाही. भुजबळ यांचा नाशिक आणि महाराष्ट्राला फायदा होईल. जास्त आमदार म्हणून पालकमंत्री पदावर दावा, असे नाही मी कशावरच दावा करत नाही. पक्ष महत्वाचा आहे, एकाच पक्षात राहून आपण गटबाजी करत राहिलो तर काही उपयोग होणार नाही. भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
भुजबळांचे ते भाष्य उतावीळपणाचे होते
माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, काही लोक उतावीळ आहेत. पण अजितदादा न्याय देतात. काही वेळेस वाट बघावी लागते. लगेच भाष्य करणे चुकीचे आहे. वेट अँड वॉचची भूमिका घेतली की फायदा होतो, हा अनुभव माझ्यासह भुजबळांना देखील आला आहे. जहा नहीं चैना, वहा नहीं रैना… हे भुजबळांचे ते भाष्य उतावीळपणाचे होते. भुजबळ आमच्यापेक्षा देखील सिनियर आहेत. आता त्यांना न्याय मिळाला आहे. आम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांचे ते व्यक्तिगत मत
भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार हे जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, मनोज जरांगे यांचे ते व्यक्तिगत मत आहे. त्यांचं आणि भुजबळांचं काय आहे ते मला माहिती नाही. अजितदादा खंबीर नेतृत्व आहे. मी जर अजितदादांच्या जवळ लवकर गेलो असतो तर फायदा झाला असता, असो… देर आये दुरुस्त आये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच…; मंत्रिपदाची शपथ घेताच छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल
अधिक पाहा..
Comments are closed.