मनोहर भोसलेचा घोटी आश्रम बंद करा; ग्रामस्थ आक्रमक, पोलीस अधीक्षकांना पत्र
सोलापूर : करमाळा तालुक्यातील घोटी येथे भोंदू मनोहर भोसले याच्या आश्रमाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणात भोसले अटकेत असताना त्याचा आश्रम तात्काळ बंद करावा, अशी मागणी पुढे आली आहे. घोटी गावचे सरपंच विलासकाका राऊत यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आश्रमाची सखोल चौकशी करून तो बंद करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Ghoti Villagers Protest : ग्रामस्थांची आक्रमक भूमिका
मनोहर भोसलेच्या घोटी येथील आश्रमात दर अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं समोर आलं आहे. बाहेरील राज्यांतील लोकही येथे वास्तव्यास असल्याची माहिती देत ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे.
Black Magic Allegation : जादूटोणा आणि फसवणुकीचे आरोप
मनोहर भोसले लोकांना ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली जादूटोणा करत असल्याचा आरोप आहे. यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ghoti Villagers Stand : ग्रामस्थांचा ठाम नकार
घोटी गावातील कोणताही ग्रामस्थ मनोहर भोसले यांच्याकडे जात नसून त्यांच्या संपर्कातही नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता मनोहर भोसलेचा घोटी येथे 27 एकरावर असणारा आलिशान आश्रम बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
Ghoti Ashram : यापूर्वीही आश्रम बंद
2021 मध्ये करमाळा-इंदापूर सीमेवरील मांजरगाव येथे असलेला भोसलेचा आश्रम गुन्हा दाखल झाल्यानंतर बंद करण्यात आला होता. त्यावेळीही स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता घोटी येथील 27 एकरावर पसरलेल्या आलिशान आश्रमाबाबत पोलीस काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Who Is Manohar Mama Bhosale : कोण आहे मनोहर मामा भोसले?
- इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी.
- डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता.
- एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला.
- करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता.
- साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली.
- अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत.
- अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
- या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
- कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
- 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.