17 सप्टेंबरआधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा ल

मनोज जारानरेंज पावेल: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन आदेश (GR) जारी केला होता. या आदेशामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबतच पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या शासन आदेशाविरोधात आक्रमक भूमिका घेत, सरकारविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत छगन भुजबळ मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरविरोधात याचिका दाखल करणार आहेत. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केलाय. 17 सप्टेंबरआधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.

मराठवाडा 100 टक्के आरक्षणात जाणार

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गरिबांनी जीआर काढला, हैदराबाद प्रमाणपत्र देण्यात यावे तर अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासक देखील पागल झाले. म्हणजे गरीबाच्या लेकरांनी किती मजबूत जीआर काढलेला आहे. आमच्या विरोधातले काही लोक तर इतके पागल झाले आहेत की, त्यांना झोपाच येईना. मराठवाडा 100 टक्के आरक्षणात जाणार आहे. मराठ्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. पण माझा मराठ्यांना एक सल्ला आहे की, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे, थोडं संयमाने घ्या, असे त्यांनी म्हटले.

दसरा मेळाव्याला सरकारला कळेल की…

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी करून नोंदी केल्या नाही तर येत्या दसऱ्या मेळाव्यात आम्हाला सरकारच्या विरोधात आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे. फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा, विखे साहेबांनी सांगितले आहे की आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केले आहे. मग आता 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आत याची अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे. प्रत्येक गावातील नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा. जर अंमलबजावणी सुरू झाली नाही तर येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळेल की आता सरकारची बितली, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

येवल्यावाल्याचे ऐकून जीआरमध्ये हेराफेरी केली तर…

मला शंभर टक्के खात्री आहे की, सरकार आता मराठ्यांच्या अपमान करणार नाहीत आणि हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील. मराठे शंभर टक्के जिंकलेले आहेत. आपण खूप मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेलो आहोत. जीआरमध्ये काही बदलायचे असेल तर ते सरकारने बदलायचे. आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे आहे. बाकीचे नाटक बंद करा. त्याच्यात काही शब्द चुकलेला असेल तर तो सरकारने बदलावा. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितले की, आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढतोय. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. आता आम्हाला त्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र हवे आहे. जर कोणाचेही ऐकून थोडं जरी इकडे-तिकडे केले. त्या येवल्यावाल्याचे (छगन भुजबळ) ऐकून जीआरमध्ये हेराफेरी केली तर 1994 चा जीआर आम्हीदेखील चॅलेंज करू आणि तो सुद्धा रद्द करावा लागणार आहे. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठू, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा रोष घेणार नाहीत

छगन भुजबळ मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणार आहेत. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचे GR चॅलेंज होणार नाही. मात्र तुमचे आरक्षण उडणार आहे. 94 चे आरक्षण उडवून आमचे आम्हाला आरक्षण द्या. आमच्या GR ला खोड करून अडचणी आणल्यास महाराष्ट्रात यांना येऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा रोष घेणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=F2J0KJI0OWA

आणखी वाचा

Maratha Reservation Chhagan Bhujbal: मोठी बातमी: सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार

आणखी वाचा

Comments are closed.