अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ म्हणजे मराठा मुलांचे सिबिल खराब करण्याची यंत्रणा, मराठा आंदोलक
विरेंद्र पवार: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत (Mumbai Morcha) धडकणार आहे. मनोज जरांगे आमरण उपोषण करण्यापूर्वी तयारीची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मुंबई आणि उपनगरातील मराठा समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिर येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत बैठक पार पडली. या बैठकीनंतर मराठा आंदोलक विरेंद्र पवार (Virendra Pawar) यांनी घणाघाती टीका केली आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ म्हणजे मराठा मुलांचे सिबिल खराब करण्याची यंत्रणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठा आंदोलक विरेंद्र पवार म्हणाले की, मनोज जरांगे आंदोलन करत आहेत हे लक्षात आल्यावर आता 1 वर्षापासून झोपलेलं सरकार जागं झालं आणि आता मराठा आरक्षण उपसमिती सरकारने नेमली. ज्यांनी समाजाबाबत चुकीची वक्तव्य केली, त्यांना सरकारने समितीचं अध्यक्ष केलं. मराठा समाजासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. परंतु, याचा व्याज परतावा मिळत नाही. मराठा समाजाच्या मुलांचे सिबिल खराब करण्याची यंत्रणा म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, असे त्यांनी म्हटले.
आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या
विरेंद्र पवार पुढे म्हणाले की, या समितीने सांगितलं की, प्रत्येक जिल्ह्यात आम्ही वसतिगृह करू. 5 कोटी त्यासाठी ग्रांट देऊ. कुठे आहे वसतिगृह आणि कुठे आहे ग्रांट? प्रत्येकवेळी समाजाला चुकीच्या प्रकारचे आरक्षण देता आणि कोर्टाच्या पिंजऱ्यात उभे करतात, हे आम्ही सहन करणार नाही. आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या. यासाठी घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील मराठा यंदा अरबी समुद्रात गणपती विसर्जन करणार
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या ‘चलो मुंबई’ या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून यंदाचा गणपती आम्ही अरबी समुद्रात विसर्जित करू. मुंबईकरांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी केले आहे. मुंबईत दीड दिवसाचा गणपती असतो. मात्र, महाराष्ट्रात दहा ते तेरा दिवसापर्यंत गणपती असतो. यावर्षी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी राज्यातील लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार असून यंदाचा आमचा गणपती अरबी समुद्रात विसर्जित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईकर आमच्या या निर्णयाच्या पाठीशी राहून आम्हालाही अरबी समुद्रात गणपती विसर्जन करू देतील, अशी अपेक्षा धनाजी साखळकर यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत पंचवीस हजार गाड्यांची नोंदणी झाली असून पुढील तीन दिवसात हा आकडा 50 हजारापर्यंत पोहोचेल असा विश्वास साखळकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा घरी गौरी गणपती असूनही मोठ्या संख्येने मराठा महिला या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावाही साखरकर यांनी केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.