भिवापूरमध्ये अग्नितांडव, अर्धे गाव जळून खाक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर परिसरात अग्नितांडव पाहायला मिळाला. सोसाट्याचा वारा, पालापाचोळा आणि सुकलेल्या गवतामुळे एकच आगडोंब उसळला. आग इतकी भीषण होती की अक्षरशः अर्धे गाव जळून खाक झाले. या आगीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून जनावरेदेखील दगावली आहेत. आग लागताच ग्रामस्थांनी घराबाहेर पळ काढल्याने सुदैवाने ते बचावले.

धामणगाव विद्यामंदिर येथील एका ग्रामस्थाने सायंकाळी शेतातील पालापाचोळा जाळला. मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने काही क्षणातच आग सर्वत्र पसरली. ग्रामस्थांनी घरासमोर गोळा केलेली लाकडे, लाकडी वासे, गुरांसाठी आणलेला सुका घास आणि सुकलेल्या गवतामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीने अनेक गोठे व घरांना भक्ष केले. ग्रामस्थांनी गोठ्यात बांधलेल्या गाय, बैल, शेळ्यांसह अन्य पाळीव प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. दुग्धव्यवसाय व कुकुटपालन करणाऱ्या ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. घराची राखरांगोळी झाली असून जनावरेही दगावल्याने उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Comments are closed.