शार्दुल ठाकूर अन् सिद्धेश लाड ‘क्रिकेटर ऑफ द इयर’; MCAकडून विश्वविजेत्या खेळाडूंचाही गौरव

मुंबई क्रिकेट असोसिएशन पुरस्कार: मुंबई क्रिकेटचा गौरवशाली वारसा आणि खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीचा सन्मान करण्यासाठी ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’तर्फे (MCA) एका भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 2024-2025 आणि 2025-26 या दोन मोसमांतील सर्वोत्तम खेळाडू, मार्गदर्शक आणि प्रशासकांचा गौरव करण्यात आला. मुंबईच्या क्रिकेट शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

MCA : वरिष्ठ क्रिकेटपटूंचा सन्मान

वरिष्ठ स्तरावरील कामगिरीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जस्टिस तेंडुलकर ट्रॉफी’ (सर्वोत्कृष्ट वरिष्ठ क्रिकेटपटू) पुरस्कार यंदा दोन दिग्गजांना मिळाला. २०२४-२५ सालासाठी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याला, तर २०२५-२६ सालासाठी सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सिद्धेश लाड याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धेश लाडने रणजी चषकात सर्वाधिक धावा केल्याबद्दल ‘एस. व्ही. राजाध्यक्ष ट्रॉफी’वरही आपले नाव कोरले, तर शम्स मुलानी याला सर्वाधिक बळी घेण्याबद्दल गौरविण्यात आले.

Mumbai Cricket Association Awards : विश्वविजेत्यांचा जयजयकार

भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचे योगदान किती मोठे आहे, याची प्रचिती या सोहळ्यात आली. अलीकडच्या काळात विविध विश्वचषकांमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या मुंबईकर खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे, टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा समावेश होता. तसेच महिला विश्वचषक विजेत्या संघातील जेमिमा रॉड्रिग्स, प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि अविष्कार साळवी यांच्यासह सानिका चळके आणि अभिज्ञान कुंडू या युवा ताऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

MCA News : जीवनगौरव आणि युवा प्रतिभा

मुंबई क्रिकेटसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या चार दिग्गजांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेळाडू गटातून चंद्रकांत पाटणकर आणि शोभा पंडित, तर प्रशासक म्हणून रवींद्र सावंत आणि श्रीकांत तिगडी यांचा गौरव करण्यात आला.

युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘शरद पवार शिष्यवृत्ती’चे वाटपही यावेळी करण्यात आले. नमन ढुमळ, श्रेयस खिलारे, सानमया उपाध्याय आणि रितिका यादव यांसारख्या उदयोन्मुख खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी आर्थिक बळ देण्यात आले.

Ajinkya Naik : अध्यक्षांचे प्रतिपादन

एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आपल्या भाषणात मुंबई क्रिकेटच्या शिस्तीचे आणि महत्त्वाकांक्षेचे कौतुक केले. ते म्हणाले, “मुंबई क्रिकेटने नेहमीच देशात सर्वोच्च दर्जा राखला आहे. हे पुरस्कार केवळ खेळाडूंचा सन्मान नसून येणाऱ्या पिढीसाठी ते एक ध्येय आहेत. मुंबईची ही क्रिकेट फॅक्टरी भविष्यातही भारताला असेच हिरे देत राहील.”

या सोहळ्याला सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि डायना एडल्जी यांसारख्या महान क्रिकेटपटूंच्या उपस्थितीने विशेष झळाळी प्राप्त झाली.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.