Mega Block – मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांकरीता मध्य रेल्वेवरील उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 2.17 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 2.58 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, मुलंड स्थानकावर या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवण्यात येतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादरच्या दिशेने येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान डाऊन हार्बर लाईनवर सकाळी 10.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप हार्बर लाईनवर सकाळी 10.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.10 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी 10.06 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.12 ते दुपारी 3.20 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा, तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 9.13 ते सायंकाळी 5.13 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ठाणे – वाशी/नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहतील. पोर्ट लाईन (उरण लाईन) सेवा नेरुळ/बेलापूर – उरण – नेरुळ/बेलापूर स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहतील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन स्लो लाईन्सवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या सर्व स्लो लाईन गाड्या फास्ट लाईन्सवर धावतील.

या ब्लॉकमुळे, काही अप आणि डाउन उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील. चर्चगेटला जाणाऱ्या काही गाड्या फक्त वांद्रे किंवा दादरपर्यंतच धावतील. प्रभावित सेवांची यादी उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवर उपलब्ध असेल.

Comments are closed.