अखेर प्रतीक्षा संपली, म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत ठाण्यात होणार, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

म्हाडा कोकण बोर्ड मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2147 सदनिका व 117  भूखंड विक्रीकरिता 05 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 01.00 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली आहे. कोकण मंडळाच्या 2147  सदनिका व 117 भूखंड विक्रीकरिता सुमारे 24911 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला 11 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रारंभ करण्यात आला.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live) बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. तसेच वेबकास्टिंगद्वा  https://youtube.com/live/GyDu-FXxuHw?feature=share या लिंकवरूनही सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना ईमेल व एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन अशा IHLMS 2.0 या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे नागरिकांचा सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, सुरुवातीला म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या विक्रीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर कोकण मंडळानं मुदतवाढ दिल्यानंतर अर्जदारांच्या संख्येत वाढ झाली. आता उद्या सोडतीत कुणाचं घराचं स्वप्न पूर्ण होतं ते समोर येईल.

इतर बातम्या :

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर

अधिक पाहा..

Comments are closed.