म्हाडाकडून नाशिकमधील 402 घरांसाठी लॉटरी, 14 ते 36 लाखांच्या घरांची सोडत, जाणून घ्या माहिती
मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारात असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 402 निवासी सदनिका आगाऊ अंशदान (Advance Contribution) तत्वावर विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला आज गो लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमावेळी संजीव जयस्वाल म्हणाले की, सन 2025 मध्ये नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या सोडतीपूर्वी तीन सदनिका सोडतींद्वारे 846 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सन 2025 मध्ये म्हाडा नाशिक मंडळातर्फे आयोजित ही चौथी सदनिका सोडत असून अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. सदर योजनेतील सदनिकांच्या विक्री किंमतीचा भरणा सोडतीत विजेत्या ठरलेल्या यशस्वी अर्जदारांनी 5 टप्प्यांमध्ये करायचा आहे.
नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सदर सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चुंचाळे शिवारात 138 सदनिका, पाथर्डी शिवारात 30, मखमलाबाद शिवारात 48 सदनिका, आडगाव शिवारातील 77 अशा एकूण 293 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर शिवारात 40 सदनिका, पाथर्डी शिवारात 35, आडगाव शिवारात 34 अशा एकूण 109 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रु. 14,94,023/- ते रु. 36,75,023/- दरम्यान या सदनिकांच्या किंमती आहेत.
इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. दि. 23 डिसेंबर,2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याची मुदत आहे. दि. 23 डिसेंबर, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. दि. 24 डिसेंबर, 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. दि. 30 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 03.00 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 30 डिसेंबर, 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपासून ते दि. 02 जानेवारी, 2026 रोजी सायंकाळी 06. 00 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर ऑनलाइन आक्षेप/ दावे-हरकती दाखल करता येणार आहे.
दि. 06 जानेवारी, 2026 रोजी सायंकाळी 06.00 वाजता दावे-हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम यादीची प्रसिद्धी केली जाणार आहे. सोडतीचा दिनांक, वेळ व स्थळ संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार आहे.
सोडतीसाठी अर्ज करताना अर्जदारास दि. 01 एप्रिल 2024 ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरला जाईल.
सोडतीत समावेश असलेल्या योजनांची सविस्तर माहिती, पात्रता निकष, आरक्षण, अर्ज करण्याची कार्यपद्धती, अटी व शर्ती इत्यादी बाबी नमूद असलेली माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडतीकरिता अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा, असे आवाहन नाशिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदीरकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा
Comments are closed.