मिनी बोरघाटात बस जळून खाक, १५ प्रवासी थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. बोरघाटातील खोपोली बायपासजवळ मिनी बस जळून खाक झाली. मुंबईहून प्रवासी घेऊन निघालेली ही बस खोपोली बायपासजवळ येताच अचानक गाडीने पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे १५ प्रवासी थोडक्यात बचावले. जीवितहानी टळली असली तरी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.

चालक योगेश काकडे मुंबईहून पुण्याला मिनी बस घेऊन निघाले होते. गाडीत १५ प्रवासी होते. द्रुतगती व मिसिंग लिंकवरून बस खोपोली बायपासजवळ येताच पहाटे साडेतीन वाजता अचानक इंजिनमधून शॉर्टसर्किट होऊन धूर येऊ लागला. यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने बस बाजूला घेऊन प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर बोरघाट व खोपोली पोलीस, आयआरबीची फायर रेस्क्यू टीम तसेच खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

दैव बलवत्तर म्हणून…
सर्वजण साखरझोपेत असतानाच अग्नितांडव घडले. इंजिनमधून धूर आल्यानंतर काही सेकंदांत बोनेटमधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. या आणीबाणीच्या क्षणी चालक योगेश काकडे यांनी मोठ्या कौशल्याने बस बाजूला घेऊन प्रवाशांना झोपेतून उठवून खाली उतरवले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून सर्वजण वाचले.
अर्धा तास वाहतूक रोखली
आगीच्या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास रोखून धरण्यात आली होती. जळीत बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली. जळीत बसमधील प्रवाशांनाही दुसऱ्या बसने पुण्याला रवाना करण्यात आले.

Comments are closed.