भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला महाजन, म्हणाले टार्गेट करणं योग्य नाही, तो निर्णय सामूहिक
गिरीश महाजन: विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीडच्या महाएल्गार सभेत केली होती. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरचा निर्णय एकट्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा नाही. तो समितीचा सामूहिक निर्णय आहे. त्यामुळे कोणाला टार्गेट करणे योग्य नाही. सरकार म्हणून तो निर्णय घेतलेला आहे असे महाजन म्हणाले. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले होते छगन भुजबळ?
शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीडच्या महाएल्गार सभेत केली. तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे (Manoj Jarange) जातात. भाजपच्या (BJP) लोकांना मला सांगायचे आहे की, तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे. जरांगे-पाटील यांच्याशी वारंवार भेटीगाठी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला महत्त्व देत नाही
ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या मुद्यावर देखील गिरीश महाजन यांना प्रसारमाध्यमांनी विचारले. यावर बोलताना महाजन म्हणाले की, त्यांना एकत्र येऊ द्या, एकत्र येऊन फटाके फोडू द्या. त्यात काही वावगं नाही. कोणीही एकत्र आले तरीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीचा विजय होईल यात शंका नाही. मी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला महत्त्व देत नाही असे महाजन म्हणाले.
आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये एकच आहोत, त्यांच्या काँग्रेसमध्येच चार नेते चार वेगवेगळ्या कोपऱ्यावर आहेत. त्यांच्याच पक्षातील चार नेत्यांची तोंड एका दिशेला नाहीत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर काय टिका करत आहेत. त्यांच्यात कुठेच एकमत नसून त्यांचे अध्यक्ष काही म्हणतात दुसऱ्या अध्यक्ष काही म्हणतात असे म्हणत महाजन यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.
आणखी वाचा
Comments are closed.