मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खाते अजित पवारांकडे

मुंबई : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकीय वर्तुळातील ही सर्वात मोठी बातमी असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे. माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर, सर्व घडामोडी वेगाने घडल्या आहेत.

सदनिका घोटाळाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे आज सकाळीच मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित पवारांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने काल (मंगळवारी, ता १६) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यामुळं माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते.  कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.