माणिकराव कोकाटेंना व्यक्तीस्वातंत्र्य देणार की नाही? मंत्री विखे पाटलांकडून व्हिडिओची पाठराखण
अहिलीनगर: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचा विधानसभेत रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून मंत्री कोकाटे यांचा राजीनामा मागितला जात असून विविध शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. लातूरमध्ये छावा संघटनेकडून राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून कृषिमंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला. त्यावरुन, बराच गदारोळ झाल्यानंतर मारहाणीची घटनाही घडली. त्यामुळे, कृषिमंत्र्यांविरुद्ध छावा संघटनेसह विरोधी पक्षातील विविध नेते आक्रमक होऊन राजीनाम्याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे कोकाटेंच्या कृत्याचे कुणीही समर्थन केलं नाही. मात्र, मंत्री राधाकृष्ण विके पाटील (राधाकृष्ण यांच्याकडून पाठराखण करण्यात आल्याचं दिसून येत आहे. माणिकराव कोकाटेंना व्यक्तीस्वातंत्र्य देणार की नाही? असा सवाल विखे पाटील यांनी विचारला आहे.
माणिकराव कोकाटेंना व्यक्तीस्वातंत्र्य देणार की नाही? कुणी काय करावे आणि काय नाही हे कोण ठरवणार? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. तसेच, झालेल्या प्रकाराबाबत माणिकराव कोकाटे यांनी स्वतः खुलासा केलाय, मात्र लगेच निष्कर्ष काढून त्यांना आरोपी ठरवणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले. विधिमंडळात व्हिडिओ काढून कोकाटेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे का?, असा सवाल विचारला असता हे शूटिंग नेमकं कुणी केलं? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलं. सभागृह सुरू असताना अनेकजण मोबाईलवर बातम्या बघतात. अचानक रमीचा डाव आला याचा अर्थ असा नाही की माणिकराव रमी खेळत होते. त्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ घेतला असेल तर एव्हढा गदारोळ करण्याची गरज काय?. त्यांच्या कृत्यामुळे कुणाची आर्थिक हानी झालीय का? असा सवाल देखील विखे पाटलांनी उपस्थित केला आहे.
महायुतीवर परिणाम होतो
आम्ही महायुती म्हणून काम करतो, ज्या पक्षाकडून चुका होतात, त्या पक्षाच्या नेतृत्वाने दुरुस्त केल्या पाहिजेत. महायुतीवर या गोष्टींचा परिणाम होतो, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. जनादेशाचा आदर केला पाहिजे, घटक पक्षातील लोक अशा पद्धतीने वागत असतील तर त्यांना अटकाव केलाच पाहिजे, अशी भूमिका देखील विखे पाटील यांनी मांडली.
सूरज चव्हाणला टोला
सुनील तटकरे यांनी स्वतः त्या घटनेचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी सूरज चव्हाणचा राजीनामा घेतला असून अशा घटनांचे कुणीही समर्थन करणार नाही. नेत्यांसमोर प्रामाणिकपणा दाखवण्याच्या नादात अतिउत्साही कार्यकर्ते असे उद्योग करतात. मात्र, अशा अतीउत्साही कार्यकर्त्यांमुळे नेते आणि पक्ष अडचणीत येतात, असे म्हणत विखे पाटील यांनी सूरज चव्हाण यांच्यासह अतिउत्साही कार्यकर्त्यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा
तीन दिवसांपूर्वीच म्हणाले मी मीडियाला बोलणार नाही; आता थेट ‘तू अन् मी’ एकटा मैदानात येण्याचं चॅलेंज
आणखी वाचा
Comments are closed.