दंगली भडकण्याची अल्पसंख्याक आयोगाला भीती, नवनीत राणांवर पोक्सोअंतर्गत कारवाईची मागणी
अमरावतीतील परतवाडा आणि अचलपूर भागातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार तसेच ब्लॅकमेलिंगच्या कथित रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आरोपी यांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या नवनीत राणा यांचा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी खरपूस समाचार घेतला आहे. नवनीत राणांना दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे त्या या सगळ्या करत आहेत. नवनीत राणांवर पोक्सोअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी माझ्याकडे आली आहे, असे प्यारे खान म्हणाले.
अमरावतीतील घटनेनंतर काही राजकीय नेत्यांनी अनेक अफवा पसरवल्या आहेत. आम्ही एक पथकही परतवाड्याला पाठवले होते. अफवा पसरवणारे नेते कितीही मोठे असले तरी त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. अफवा पसरवण्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश अमरावतीचे पोलीस आयुक्तांना दिले आहेत, असे प्यारे खान या वेळी म्हणाले. नवनीत राणा यांना ही माहिती कशी काय समजली. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून नवनीत राणा यांना पक्षातून बाहेर काढा अशी मागणी करणार आहे, असे प्यारे खान पत्रकार परिषदेत म्हणाले.
काय आहे नेमके प्रकरण?
मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी अयान अहमद याने विविध मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरुद्ध अश्लील चित्रीकरण केले. ते फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी केली. यात धर्माचा कोणताही रंग नाही. पोलीस योग्य तपास करत आहेत, असे प्यारे खान म्हणाले.
Comments are closed.