Video: मंत्री प्रताप सरनाईकांसमोर 50 खोकेच्या घोषणा, प्रचंड विरोध, मोर्चेकरांनी हुसकावून लावलं

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये (Mira bhayandar)मराठी एकीकरण समितीने मोर्चाची (March) हाक दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाने या मोर्चास पाठिंबा देत आज सहभागही घेतला. त्यामुळे, या मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झाले आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मारहाणाच्या विरोधात मोर्चा काढला होता, या मोर्चानंतर आता मराठी अस्मिता आणि मराठीच्या मुद्द्यावरुन मीरा भाईंदरमध्ये मराठीजन एकत्र आले असून मनसे आणि शिवसेना नेत्यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठा पोलीस बंदोबस्त मोर्चाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे अविनाश जाधव यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्धही केले होते. त्यातच, शिवसेना नेते आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे या मोर्चात सहभागी झाल्यानंतर मोर्चेकरांनी प्रताप सरनाईक यांना विरोध दर्शवला.

मीरा-भाईंदरचे लोकप्रतिनिधी आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हेही मी आधी मराठी नंतर मंत्री असे म्हणत मोर्चात सहभागी झाले होते. मी मराठी लिहिलेली गांधी टोपी परिधान करुन ते मोर्चात आले. मात्र, प्रताप सरनाईक यांना पाहताच मोर्चेकरांनी जय गुजरात आणि 50 खोके एकदम ओक्के.. अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, प्रताप सरनाईक यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मी जेव्हा मीरा भाईंदरच्या हद्दीत प्रवेश करतो, तेव्हा माझ्या तोंडून हिंदीच निघते, असे सरनाईक यांनी त्या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते. त्यामुळे, मराठी एकीकरणासाठी निघालेल्या या मोर्चातील आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या सहभागाला थेट विरोध दर्शवला. त्यानंतर, प्रताप सरनाईक माघारी फिरले असून अधिवेशनासाठी मुंबईला गेले. विशेष म्हणजे मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रताप सरनाईक हे मुंबईतील पावसाळी अधिवेशनातून मीरा भाईंदरमध्ये आले होते.

https://www.youtube.com/watch?v=OWTQA_GLPWK

पोलिसांनी परवानी नाकारली

मीरा भाईंदरमध्ये आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे (Datta Shinde) यांनी मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांनी मोर्चासाठी एकत्र येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तरीही मराठी एकीकरण समितीने पुढाकार घेत शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांसह विराट मोर्चा काढला. अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. दरम्यान, अविनाश जाधव यांचीही पोलिसांनी सुटका केली आहे.

फडणवीसांनी सांगितलं कारण

पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मनसे आणि पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्या रुटबाबत चर्चा सुरु होती. मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल, असा रुट मागत होते. पण पोलीस त्यांना नेहमीचा रुट घ्या, असे सांगत होते. मात्र, मनसेने त्याला नकार देत आम्ही आमच्याच मार्गाने जाणार अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा

इन्फोसिसची नोकरी सोडून लेफ्टनंटपदी निवड; सांगलीच्या भूमीपुत्रास प्रशिक्षणादरम्यान वीरमरण

आणखी वाचा

Comments are closed.