मिसिंग लिंकसाठी टोलवाढ नाही; चारचाकी आणि बसेसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘अॅक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे 99 टक्के काम पूर्ण झाले असून महाराष्ट्रदिनी म्हणजेच 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नवीन टोलवाढ होणार नसून चारचाकी आणि बसेसमधून होणाऱ्या प्रवाशी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. 70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल.

या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूककोंडी मोठय़ा प्रमाणात कमी होईल. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोलनाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्याच्या उद्घाटनाची घोषणा केली. या वेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.

सुमारे 6700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला 2019 साली मंजुरी देण्यात आली होती. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला अॅक्सेस कंट्रोल मार्ग ठरला होता. या मार्गामुळे आयटी, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली.

या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल. यासाठीच या प्रकल्पातील बोगद्यांनादेखील गडकिल्ले आणि कार्ला लेण्यांच्या प्रतिकृतीप्रमाणे सजवण्यात आले आहे.

Comments are closed.