जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, माझी मुलगी ख्रिश्चन घरात दिली
मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक समजून सांगितल्यानंतर विरोधकांनी यावर भूमिका मांडली. ठाकरेंच्या शिवसेनेनं विधेयकास पाठिंबा दिला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध दर्शवला आहे. धर्म स्वातंत्र्य या बिलाच्या हेतुला आमचा विरोध आहे, जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोध आहे. धर्मस्वातंत्र्य या नावाने बिल आणणे म्हणजेच संविधानाला छेद देणं आहे. गौतम बुद्धांनी केलेल धर्मांतर हे पहिलं धर्मांतर आहे, मग बुद्ध, जैन आणि बसवेश्वर यांनाही आता जेलमध्ये जावा लागल असतं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयकास विधानसभेतील चर्चेदरम्यान आपला विरोध दर्शवला आहे. यावेळी, आपल्या मुलीच्या लग्नाचेही उदाहरण त्यांनी दिले. जातीच्या भिंती तोडायच्या असेल तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली, असे आव्हाड यांनी म्हटले.
तुकाराम महाराज यांचे अभंग स्विकारण्याऐवजी त्यांना कुठपर्यंत आपण घेऊन गेलो, धर्माला विरोध करुन जर कोणी धर्मांतर करत असेल तर ते सर्वात मोठं हिंदूंमधील एक्सेप्शन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं, त्यांनी आज संविधान लिहीलं. त्यामुळे, योगेश सागर तुम्ही आज येथे बसलात, असे म्हणत आमदारांना उद्देशून जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात धर्म स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा केली.
एक मुलगा आणि मुलगी यांनी जर संवैधानिक पद्धतीने जर विवाह केला तर त्यांना तुम्ही मारझोड करणार आहेत का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. बिलाच नाव तुम्ही धर्म स्वातंत्र्य म्हटलं आहे, हे तर धर्म नियंत्रण आहे, मला वाटलं तर मी धर्मांतर करतो. नोटीस कशाला द्यायची, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला, सावित्रीबाईंवरती शेण फेकलं हे धर्म स्वातंत्र आहे का? मी हिंदू आहे, मी ज्या सोसायटीत राहत होते त्या ठिकाणी माझ्या आईला शेवटपर्यंत पुजेसाठी बोलवत नव्हते. हे आम्ही आईला विचारायचो तर ती म्हणायची की मला हे पटत नाही. पण, आम्ही पुस्तक वाचायला लागलो त्यावेळी मला कळायला लागलं हे आज सभागृहात मी उघडपणे सांगतोय, असे म्हणत आव्हाड यांनी वर्णव्यवस्थेवरुन भाष्य केलं.
माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली
जातीच्या भिंती तोडायच्या असेल तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात स्वत:च्या मुलीच्या लग्नाचं उदाहरण दिलं. काही मिशनरींचं योगदान आहे, रस्त्यावरची मुलं त्यांनी शाळेत आणली. संविधान आल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी धर्म बदललाय, संविधानाच्या आधी त्यांनी धर्म नाही बदलला. धर्मांतराला आमचा विरोध नाही, मात्र या विधेयकाच्या नावाला आमचा विरोध आहे. विशेष समाजाचा पगडा यावर येणार आहे, संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालता येत नाही. मात्र, तुम्ही धर्म स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही नियंत्रण आणत आहात, असेही आव्हाड यांनी सभागृहात सांगितले.
शिवरायांचा उल्लेख केल्यावरुन वाद
तुम्ही संविधान बदलण्याची साधी कल्पना मांडली तर किती जागा तुमच्या गेल्या, तुमही तर आता गाभ्याला हात घातला आहे. महाराष्ट्र ते सहन करणार नाही, असे म्हणत आव्हाड यांनी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं उदाहरण दिलं. मात्र, आव्हाड यांनी वापरलेल्या वाक्यावरुन सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विरोध दर्शवला. मंत्री, शंभुराज देसाई यांनी, असा उल्लेख कुठे आहे, हा चुकीचा उल्लेख आहे, आव्हाडांना माफी मागायला लावा, असे म्हटले. त्यानंतर, जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केलेले आहे माफी मागायला लावा, असे आमदार योगेश सागर यांनीही म्हटले. तर, भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरून जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यामुळे, गोंधळ निर्माण झाल्याने सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली होती. त्यावर, अध्यक्षांनीही जितेंद्र आव्हाडांना माफी मागण्याचे निर्देश दिले.
जितेंद्र आव्हाडांची सभागृहात माफी
हे विधेयक अतिशय महत्वाच आहे, या देशाचं अराध्य दैवत, त्यांच्यासंदर्भात असं वक्तव्य ठीक नाही. देशात याचे पडसाद उमटू शकतात. मात्र या सभागृहातून ते होऊ नये. आपल्या तोंडातून जे शब्द गेले आहेत, त्यासंदर्भात दिलगीरी व्यक्त केली पाहिजे. आपण दिलगिरी व्यक्त करा, असे निर्देश मी देतो, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यावर, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत आव्हाड यांनी विषय मिटवला. त्यानंतर, जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, मी हे पटलावरुन काढून टाकत आहे, असे अध्यक्षांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.