जितेंद्र आव्हाड म्हणाले, पत्रकार तुपेच्या हत्येचं खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांचं स्पष्टीकरण
मुंबई : राज्यात सध्या नाशिकमधील अशोक खरात (अशोक खरात) प्रकरणावरुन दररोज नवनवे खुलासे होत असून अनेक प्रकरणं समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही गंभीर आरोप केले आहेत. अशोक खरात याला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळू तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नाही अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आता, आव्हाड यांच्या आरोपावर बाळू तुपे खून प्रकरणातील आरोपीच्या काकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाळू तुपे खून प्रकरण आणि खरातचा संबंध नसल्याचे सनी रोकडे यांनी म्हटलंय.
बाळू तुपे हा नाशिकचा पत्रकार होता, विविध विषयांना ते हात घालत होते. पत्रकारिता करताना त्यांनी अशोक खरात विरोधात बातम्या छापल्या होत्या. मात्र, त्यानंतर खरातच्या समर्थकांनी बाळू तुपेशी संपर्क साधला होता, त्यांनतर ते प्रकरण मागे पडले होते. मात्र, बाळू तुपे जमिनीच्या व्यवहारात देखील असायचे, काही राजकीय नेत्यांच्या तो संपर्कात होते. बाळू तुपे यांचा खून होण्यामागे होर्डिंग्जचा वाद असल्याचे कारण सांगितले जात होते. तर काहीजण जागेच्या वादाची किनार असल्याचे सांगत आहेत.या प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल होता मात्र यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. आता, याप्रकरणी खून प्रकरणातील आरोपींच्या काकाने समोर येऊन माहिती दिली आहे.
बाळू तुपे यांची हत्या केल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे, त्यातील कुणाल आणि संदिप रोकडे या दोन सख्ख्या भावाचे, आरोपींचे काका सनी रोकडे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. सनी रोकडे हे नाशिकमधील शिवसेना झोपडपट्टी महासंघ महानगर प्रमुख आहेत, त्यांनी संबंधित खून प्रकरणाबाबत माहिती दिली असून खरातने खून केल्याचा दावा फेटाळला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप बिन बुडाचे आहेत. तुपे आणि कुणाल रोकडे यांच्यात वाद झाला होता. त्यातून हाणामारी झाली त्याचे पुढे काय झाले माहिती नाही. रिक्षा चालवणाऱ्या सामान्य कुटुंबातील ही मुले होती, त्याचा आणि खरातचा काही सबंध नाही, असेही सनी रोकडे यांनी सांगितले. दरम्यान, यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी साधारणपणे दोन वर्षे तुरुंगात होते, ते एकूण 10 आरोपी होते.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.