ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा 22 वर्षांच्या देशांतर्गत कारकिर्दीला रामराम, आंतरराष्ट्रीय निवृत्तीही केली जाहीर
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेन्रिक्सने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सिडनी सिक्सर्स आणि न्यू साऊथ वेल्स या संघांकडून खेळलेला बिग बॅश लीग आणि ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू आहे. त्याला पोर्तुगलकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असल्याने तसेच त्याला बीबीएल 16 चा करार न मिळाल्याने त्याने ऑस्ट्रेलियामधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
हेन्रिक्सचा जन्म पोर्तुगालमध्ये झाला. त्याने ऑस्ट्रेलियामधून निवृत्ती घेतल्याने तो आता विश्वचषक पात्रता फेरीत पोर्तुगालकडून खेळण्यास पात्र आहे. 39 वर्षीय खेळाडू मार्च 2025 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाला, मात्र गेल्या हंगामात तो न्यू साऊथ वेल्सकडून लिस्ट ए क्रिकेट खेळला.
हेन्रिक्सने बीबीएलचे सर्व 15 हंगाम खेळले. त्यातील पहिल्या आणि शेवटच्या या दोन्ही हंगामांमध्ये तो अंतिम फेरीत पोहोचवला. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये सर्व फॉरमॅटमध्ये मिळून विक्रमी 420 देशांतर्गंत सामने खेळले आहेत. यामध्ये न्यू साऊथ वेल्ससाठी 110 प्रथम श्रेणी आणि 112 लिस्ट ए सामन्यांचा समावेश आहे. त्याने न्यू साऊथ वेल्ससाठी 38 टी 20 सामने खेळले.
हेन्रिक्सने 2012-13 मध्ये सिक्सर्ससाठी चॅम्पियन्स लीगमध्ये सहा टी 20 सामने खेळून संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली. त्याने तीन वेळा बीबीएलचे विजेतेपद पटकावले. तो बीबीएलच्या इतिहासात सर्वाधिक 154 सामने खेळणारा खेळाडू आहे.
“मला एक व्यावसायिक खेळाडू म्हणून गेली 22 वर्षे क्रिकेट खेळण्याचे भाग्य लाभले. मला इतर बीबीएल संघांकडूनही प्रस्ताव आले होते, मात्र दुसरीकडे जाणे मला योग्य वाटले नाही,” असे हेन्रिक्सने म्हटले आहे.
“ज्यांच्यासोबत मला खेळण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. मला वाटते आता माझी कारकिर्द संपवून पुढील अध्यायाकडे वळण्याची वेळ आली आहे,” असेही हेन्रिक्सने पुढे म्हटले आहे.
हेन्रिक्सने ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय वरिष्ठ संघाकडून चार कसोटी, 16 वनडे आणि 24 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2021 मध्ये खेळला होता. (Moises Henriques announces retirement from Australian cricket, to play for Portugal)
Comments are closed.