Nanded crime news – तलवारी, कुपऱ्या अन् खंजीर… 4 हजार 796 शस्त्र जप्त, नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
नांदेड ग्रामीण पोलिसांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 43 लाख 48 हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना खबऱ्याद्वारे अवैध शस्त्र साठ्याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकासह बुधवारी सायंकाळी शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुव्दारा परिसरात छापेमारी केली. या कारवाईत एकूण 4 हजार 796 शस्त्रे जप्त केली. ज्यामध्ये तलवारी, कुपर्या, खंजीर तसेच विविध प्रकारची धारदार शस्त्रे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जप्त केलेल्या शस्त्रांची अंदाजे बाजार किंमत 43 लाख 48 हजार रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात जसवंतसिंघ प्रकाशसिंघ सुखमनी (रा. रामदासनगर, नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे एवढा शस्त्रसाठा कसा आला आणि तो कुठे विक्रीसाठी नेला जात होता. सोबतच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे.
जप्त करण्यात आलेला संपूर्ण शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा शस्त्रसाठा कोलंबिया, चीन, अमेरिकासह इतर देशातून आणण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा आळा बसण्यास या कारवाईमुळे मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
एप्रिल महिन्यात नांदेडात 72 तासांमध्ये पाच खुनाच्या घटना घडल्या होत्या. यात वापरण्यात आलेल्या शस्त्रासंदर्भात आरोपींवर आर्म अॅक्टखाली गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. तसेच गेल्या दोन महिन्यात शस्त्र बाळगल्याप्रकरणी जवळपास 95 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Comments are closed.