आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 'प्लेयर ऑफ द मॅच'; विराटने केली रोहितची बरोबरी, विदेशी खेळाडू अव्वल स्थानी

आयपीएल २०२६ मध्ये ५७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. बुधवारी (१३ मे) रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीच्या स्टार फलंदाजाने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने ६० चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद १०५ धावा केल्या. आरसीबीने १९.१ षटकांतच १९३ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि हा सामना ६ विकेट्सने जिंकला. विराट या सामन्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ अर्थातच ‘सामनावीर’ ठरला. त्याचा हा आयपीएलमधील २१ वा सामनावीर पुरस्कार ठरला.

विराटने आयपीएलमध्ये २७९ सामने खेळले आहेत, जे बाकी खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक. त्याने सामनावीर पुरस्कार जिंकताच मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्मा याची बरोबरी करत आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या यादीत संयुक्त तिसरे स्थान पटकावले आहे. रोहितने आतापर्यंत २७८ सामन्यांमध्ये खेळताना २१ पुरस्कार जिंकले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम एबी डिविलियर्सच्या नावावर आहे. त्याने १८४ सामन्यांमध्ये २५ पुरस्कार जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फलंदाज डिविलियर्सने त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम २०२१ मध्ये खेळला होता. या यादीत दुसऱ्या स्थानी क्रिस गेल असून त्याने १४२ सामने खेळले आणि २२ पुरस्कार जिंकले आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ‘सामनावीर’ पुरस्कार –
एबी डिव्हिलियर्स – २५
ख्रिस गेल – २२
विराट कोहली – २१*
रोहित शर्मा – २१
एमएस धोनी – १८
डेव्हिड वॉर्नर – १८
केएल राहुल – १७
रवींद्र जडेजा – १७
सुनील नरेन – १७

Comments are closed.