एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवली; पेपरफुटी गोंधळानंतर विशेष बाब म्हणून एक वेळ सवलत

एमपीएससी पेपरफुटी आणि गोंधळानंतर परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी विशेष बाब म्हणून तसेच अन्य यंत्रणांमार्फत सरकारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांनाही वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

राज्य सरकारने आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने स्पर्धा परीक्षांतील गोंधळ टाळण्याठी काही महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याचा अंतरिम अहवाल सादर केला. यामध्ये सर्व भरती परीक्षांसाठी वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याची शिफारस केली आहे.

डिसेंबर 2027 पर्यंत वयोमर्यादेची सवलत

एमपीएससीने 1 जानेवारी 2026 नंतर प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिराती व निवड प्रक्रियेचा एकही टप्पा पार पडलेला नाही, अशांसाठी वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत असेल. 31 डिसेंबर 2027 पर्यंत नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्यांना ही सवलत मिळेल. गट-क परीक्षा 2026 परीक्षेसाठी अतिरिक्त पदांकरिता व वयोमर्यादा सवलतीमुळे पात्र ठरणाऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली आहे.

परीक्षेतील गोंधळ व गैरप्रकार रोखण्यासाठी

गट-क पूर्व परीक्षेच्या विद्यमान परीक्षा पद्धतीत व अभ्यासक्रमात कोणताही बदल करू नये. नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांचे मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम लवकरच जाहीर करा. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीची प्रश्नपत्रिका निर्मितीची कार्यवाही रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार करा. प्रश्नपत्रिका व ओएमआर उत्तरपत्रिकांची छपाई, साठवणूक व वाहतूक यासाठी कडक सुरक्षा ठेवा.

नऊ परीक्षांतील पेपरफुटीची चौकशी

एमपीएससीच्या नऊ परीक्षांमधील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती, पुरावे किंवा तक्रारी असलेल्या व्यक्तींना आपली निवेदने प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यात 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत सादर करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे. तक्रारी पुरावे अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्र.201, दुसरा मजला, बीकेसी वांद्रे, (पूर्व), मुंबई-51 या पत्त्यावर पाठवावे.

पदसंख्या 16 हजार करण्याची शिफारस

गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी सुमारे 12 लाख उमेदवारांनी अर्ज केले असून सध्यस्थितीत 5 हजारांहून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विविध विभागांकडून आणखी 11 हजारांहून अधिक पदांची मागणी एमपीएससीकडे आहे. ही अतिरिक्त पदे समाविष्ट करून पदसंख्या 16 हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस समितीने केली आहे.

Comments are closed.