लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार: आदिती तटकरे


मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लागलं होतं, त्यांना या निमित्तानं दिलासा मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जारी करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. याचवेळी पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करुन घेण्याचं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे.

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana आदिती तटकरेंकडून ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत घोषणा

आदिती तटकरे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचं म्हटलंय.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

ई केवायसी करण्याचं आवाहन

महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करणं आवश्यक करण्यात आलं आहे. राज्य सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. त्यासाठी विविध मार्ग अवलंबल्यानंतर ई केवायसी सुरु करण्यात आली आहे. ई केवायसी करत असताना महिलांना त्यांचा आधार क्रमांक आणि वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा लागतो. ही केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.