लाडक्या बहिणींना एप्रिलचे 1500 रुपये देण्याची प्रक्रिया सुरु, 500 रुपये किती महिलांना मिळणार?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुंबई :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपयांचा हप्ता दिला जातोय.
लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे काही तासात मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम यापूर्वी जाहीर करण्यात आल्याप्रमाणं अक्षय्य तृतीयेला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरती हा हप्ता देण्यासाठी सकाळपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
किती लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळणार?
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय जारी केले होते. दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येतो. इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सर्वसाधारणपणे दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील.
एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 9 हप्त्यांचे 13500 रुपये मिळाले आहेत. या हप्त्याचे 1500 मिळून लाडक्या बहिणींना एप्रिलअखेर 15000 त्यांच्या खात्यात मिळाले असतील. आता महिला व बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेतून एप्रिल महिन्यात किती महिलांना रक्कम दिली याची माहिती येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात महत्त्वाची ठरली होती.
अधिक पाहा..
Comments are closed.