लाडकी बहीणबाबत महत्वाचा शासन निर्णय जारी; भाजप आमदाराकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर

लाडकी बहिन योजना मुंबई :महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला मे महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटींचा निधी वितरीत केला आहे. दुसरी बाब म्हणजे भाजप आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी खात्यात येणार याची थेट तारीख जाहीर केली आहे.

सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटींचा निधी वितरीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी दरमहा सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला निधी वितरीत केला जातो. 10 जून रोजी सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या  हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपये वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

मोनिका राजळे यांच्याकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर

भाजपच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणीना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे जाहीर केले आहे. मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 12 ते 15 मे दरम्यान जमा केली जाईल असे जाहीर केले आहे. आता राज्य सरकारकडून प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया कधी सुरू करण्यात येणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलं आहे.

लाभार्थ्यांची संख्या घटली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली होती, तेव्हा त्यामध्ये विविध अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामधील प्रमुख अट कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे ही होती. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया राबवली होती. त्या नंतर लाडक्या बहिणींच्या संख्येत विविध कारणांमुळे 80 लाखांनी घट झाली होती. यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना फटका बसल्यानंतर जाहीर केली होती. या योजनेमुळे महायुती मधील घटक पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत बसले होते. महायुतीच्या नेत्यांनी त्यांची पुन्हा सत्ता आल्यास लाडक्या बहिणीना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं.

दरम्यान, वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या लाभार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवी लाभार्थी नोंदणी थांबवली आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.