आदिवासी विभागाकडून महिला बालविकासला 335 कोटी, लाडकी बहीणचे मे महिन्याचे 1500 कधी मिळणार?
लाडकी बहिन योजना मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यामध्ये गेमचेंजर ठरली होती. या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे दरम्यान देण्यात आला होता. आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागानं आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मे महिन्याच्या लाभाचे वितरण करण्यासाठी 335 कोटी 70 लाखांच्या लाभाचं वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या अपडेटनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
आदिवासी विकास विभागानं किती निधी दिला? जीआरमध्ये काय म्हटलं?
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्र.टी-५ मधील मुख्य लेखाशीर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशिर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता (लेखाशिर्ष २२३५ डी७५८) बाब क्र.३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) अंतर्गत रु.३३५७०.०० लाख (अक्षरी रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख फक्त) इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे.आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदींतुन फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी,असं देखील सांगण्यात आलं आहे.
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 कधी मिळणार?
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा निधी वितरीत केला जातो. काही महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना दोन महिन्यांची रक्कम एकत्रितपणे देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा निधी 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकत्रित देण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे दरम्यान देण्यात आला होता. आता मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या अटी
1. स्त्री महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
2. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
अधिक पाहा..
Comments are closed.