हवा बिघडली, मुंबईकरांचा कोंडमारा! कुलाबा सर्वात प्रदूषित… एक्यूआय 266 वर पोहोचला
मुंबईत थंडीला सुरुवात होताच धुरक्यात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता प्रचंड खालवायला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज हवेची सरासरी गुणवत्ता 177 म्हणजे ‘आरोग्यासाठी धोकादायक’ पातळीवर नोंदवली गेली. यामध्ये कुलाबा येथे हवेची गुणवत्ता तब्बल 266 इतकी म्हणजेच ‘प्रचंड घातक’ पातळीवर नोंदवली गेली. त्यामुळे मुंबईवर प्रदूषण वाढीचे संकट ओढावले आहे.
मुंबईत दिवाळीपासूनच प्रदूषणात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. यातच गेल्या आठवडाभरासून गारठा वाढायला झालेली सुरुवात ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे हवेत प्रदूषित घटक साचून राहत आहेत. त्यामुळे सकाळी दिसणाऱ्या धुक्यात धुरक्याचेच प्रमाण आहे. मुंबईत सुरू असणाऱ्या तीन हजारांवर बांधकामांमधून उडणारी धूळ, लाखो वाहनांचा धूर यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
एमएमआर क्षेत्रात भिवंडी सर्वाधिक प्रदूषित
मिनी मँचेस्टर आणि गोदामे अशी ओळख असलेली भिवंडी एमएमआर क्षेत्रात सहा महिन्यांतील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ पोर्टलवर नोंदवलेल्या आकडेवारीनुसार भिवंडीचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 79.9 इतका दर्शवला आहे, तर कल्याणचा एक्यूआय 72.5 वर असल्याची नोंद झाली.
श्वसनाच्या आजारांचा धोका
प्रदूषण वाढत असल्यामुळे अस्थमासारखे श्वसनाचे आजार आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास निर्माण होऊ शकतो. शिवाय सर्दी, घसा खवखवणे असे आजार होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असे आजार असणाऱ्यांनी गर्दीत जाणे टाळावे, शक्यतो मास्क वापरावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
न्यायालयाचा संताप; मुंबईची अवस्था दिल्लीपेक्षा वाईट
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हवेतील धूळ, फटाक्यांचा आवाज-प्रदूषण, बांधकामांतून उडणारी धूळ-ध्वनी प्रदूषणासह लेझर लाईटच्या वापरावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत समुद्रकिनारा आणि मोकळी जागा असूनही मुंबईतील प्रदूषणाची पातळी दिल्लीपेक्षा अधिक खराब असणे धक्कादायक असल्याचेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
प्रदूषणकारी 100 बांधकामे बंद
प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने 28 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. याच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्यासाठी 74 स्कॉड तैनात केले आहेत. यानुसार सात दिवसांची नोटीस बजावून प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करण्याची संधी दिली जाते, तर यानंतर ‘काम बंद’ करण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत 100 हून अधिक प्रदूषणकारी बांधकामांचे काम बंद करण्यात आले आहे.
क्षेत्रानुसार AQI
| मालाड | 206 |
| दादर | १७२ |
| bkc | 170 |
| चांदिवली | १७७ |
| गोवंडी | १७९ |
| जुहू | १७५ |
| कुर्ला | 170 |
| पंत नगर | 181 |
| दक्षिण मुंबई | 180 |
Comments are closed.