विदारक विदर्भ! 123 गावांना पाणीटंचाईचा भयंकर विळखा, दीड महिन्यात 155 आत्महत्या
पावसाने दगा दिल्यामुळे संपूर्ण विदर्भात यंदा विदारक स्थिती निर्माण झाली आहे. धरणे, नद्या कोरडय़ाठाक पडल्या असून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे एकटय़ा नागपूर जिह्यात 123 गावे तीव्र पाणीटंचाईच्या क्रिटिकल झोनमध्ये आहेत. दुष्काळाच्या भयंकर विळख्यामुळे विदर्भाचा पॅलिपहर्निया अशी ओळख असलेला संत्रा-मोसंबी उत्पादक पट्टा उजाड झाला आहे. आत्महत्याग्रस्त विदर्भात गेल्या दीड महिन्यात सुमारे 155 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
1970 नंतर प्रथमच पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे. पूर्व विदर्भात 665 मामा (माल गुजारी) तलाव आहेत, त्यातील गाळ काढून पाणी वाचविण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत. सर्वात जास्त मरण कोरडवाहू शेतकऱ्यांचे झाले आहे. जलजीवनच्या ठप्प पडलेल्या योजना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या उपराजधानीत पाण्याची गंभीर समस्या जाणवणार असल्यामुळे शहरातीत विहिरी साफ करण्याचे काम झपाटय़ाने सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील 865 गावांच्या उपाययोजनांसाठी 49 कोटी 68 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
डिंसेबरपर्यंत 865 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नापिकी, वाढते कर्ज आणि जगण्याच्या साधनांवर आलेला ताण यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भातील अकरा जिह्यांत ऑक्टोबरमध्ये 127 तर नोव्हेंबरच्या 16 दिवसांत 28 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये 85 तर ऑक्टोबरमध्ये 96 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान सहज मिळत नाही. त्यासाठी केवायसीची आडकाठी याकडे सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी केली.
सोयाबीन, कापूस हातचा गेल्याने शेतकरी हवालदिल
पश्चिम विदर्भात 70 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असून, सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कर्ज काढून पेरणी करणे, पीक वाचविण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही यामुळे शेतकरी कमालीचे अडचणीत आहे. विदर्भात सोयाबीन, कापसाचे पीक पाणीटंचाईमुळे गेल्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
नागपुरातील टंचाईयुक्त गावे
नागपूर 13, कामठी 41, हिंगणा 70, सावनेर 74, कळमेश्वर 73, काटोल 55, नरखेड 124, उमरेड 40, भिवापूर 51, कुही 38, मौदा 60, रामटेक 107, पारशिवनी 39.
पश्चिम विदर्भात अवस्था भयाण
पश्चिम विदर्भात भयाण अवस्था असून बुलढाणा जिह्यात- 16 गावे, अमरावती विभागात 14 गावे, अकोला जिह्यात 7 गावे, वाशीम 6 गावे, यवतमाळ 16 गावे, वर्धा 8 तालुके, नागपूर – 14 तालुके, भंडारा 5 तालुके, गोंदिया 8 तालुके, चंद्रपूर 15 तालुके, गडचिरोली दोन तालुक्यांत पाणीटंचाई आहे. ऑक्टोबरमध्ये 46 गावांत तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून खासगी विहीर अधिग्रहण करून गावकऱ्यांची तहान भागविण्यात येत आहे.
संत्री-मोसंबीच्या बागा सुकल्या
दुष्काळामुळे ‘विदर्भाचा पॅलिपहर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटोल, नरखेड, अमरावती आणि मोर्शी परिसरातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी मोठय़ा संकटात सापडले आहेत. अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळबागा पाण्याअभावी सुकत चालल्या असून 20 टन संत्र्यावर संक्रांत आली आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तुटपुंजी मदत नको, तर हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
फायनान्स कंपन्यांची दादागिरी सुरूच
राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने कोणत्याही प्रकारची सक्तीची कर्जवसुली करू नका, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले असताना ‘सितारा हाऊसिंग फायनान्स’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दादागिरीचे प्रकरण समोर आले आहे. वाहणी येथील शेतकरी विष्णू कनपटे यांनी पत्नी शांता यांच्या नावे घर बांधण्यासाठी हे कर्ज घेतले होते. मात्र दुर्दैवाने कमावत्याचे निधन झाल्याने कर्जाचे हप्ते थकले होते. फायनान्स कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांनी 20 नोव्हेंबरच्या रात्री घरातील सर्व सामान बाहेर फेकून घराला कुलूप ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.
चारा छावण्या सुरू करा!
वर्धा जिह्याला दुष्काळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. धरणाला पाणी नसल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे. माझ्याजवळ दोन बैल जोडय़ा व चार गाई, वासरे आहेत. त्यांच्यासाठी आतापासूनच चारा गोळा करावा लागणार आहे. सरकारने त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात. – विलास चंदनखेडे शेतकरी, कोलगाव (तालुका सेलू)
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली!
राज्यात सर्वत्र दुष्काळ पडला असताना सरकारने शेतकऱ्यांना कुठलीच भरीव मदत केली नाही. उजाड शेतीत काम नसल्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजप युती सरकार करीत आहे. शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदतीची गरज आहे. डॉ. नितीन राऊत, आमदार, उत्तर नागपूर
Comments are closed.