मुंबई महापालिकेच्या ठेवी 11 हजार कोटींनी घटल्या, भाजपची सत्ता येताच तिजोरीला गळती

मुंबई महानगरपालिकेचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणाऱ्या ठेवींना पालिकेवर भाजप-शिंदे गटाची सत्ता येताच मोठी गळती लागली आहे. 2021 अखेर पालिकेकडे असणाऱ्या 91 हजार 690 कोटींच्या मुदत ठेवी ऑक्टोबर 2026 मध्ये थेट 79 हजार 873 कोटींपर्यंत खाली आल्या आहेत. म्हणजेच भाजप-शिंदे गटाच्या सत्ताकाळात पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये तब्बल 11 हजार 817  कोटींची घट झाली आहे. ठेवींची उधळपट्टी पाहता चालू आर्थिक वर्षात त्यात आणखी घट होण्याची भीती निर्माण झाली असून पालिकेच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे.

पालिकेच्या मुदत ठेवींचा वापर अत्यावश्यक, मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी नियोजित आहे. विविध बँकांमध्ये या ठेवी सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. विशेषतः बँकांचे जादा व्याजदर पाहून या ठेवींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्या मुदत ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत असतो. पालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जात असतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो. त्यामुळे या ठेवी पालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. मात्र भाजप-शिंदे गटाच्या सत्ताकाळात या मुदत ठेवींमध्ये घट होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. या ठेवी अशाच घटत राहिल्या तर भविष्यात मोठय़ा प्रकल्पांचा खर्च, कर्मचाऱ्यांची देणी आणि पगार देण्यासाठी पालिकेकडे पैसे उरणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मुदत ठेवींचा लेखाजोखा प्रशासनाने स्थायी समितीपुढे मांडला आहे. यावरून पालिकेच्या ठेवींची आकडेवारी समोर आली आहे.

…तर केंद्र, राज्य सरकारकडे हात पसरावे लागतील

मुंबई पालिकेच्या ठेवींची उधळपट्टी करण्यास राज्य आणि केंद्र सरकारचेही प्रोत्साहन आहे. खुद्द पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनीही या ठेवी वापरल्याच पाहिजेत, अशी विधाने अनेक वेळा केली आहेत. यानुसार पालिका या ठेवी मोडत असून 150 वर्षांच्या आर्थिक सुबत्तेची परंपरा असणाऱ्या मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला येऊन इतर पालिकांप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारकडे निधीसाठी हात पसरावे लागतील, अशी स्थिती आहे.

मुदत ठेवी 30 हजार कोटींनी घटल्याचा काँग्रेसचा आरोप

मुदत ठेवींच्या व्याजापोटी मिळालेले 30 हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न करतानाच काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांनी मुदत ठेवींच्या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुदत ठेवीतून किती पैसे काढले, ते कोणत्या कामात खर्च झाले, भविष्यात ठेवीतून पैसे काढण्याचे काय नियोजन आहे, 2.44 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी ठेवीनाच हात घालणार का, ग्रीन बॉण्डचे व्याज भरण्यासाठीही ठेवीत हात घालणार का, पैशाच्या कमतरतेमुळे मुंबईच्या मूलभूत सुविधा पुरवण्याची गती मंदावणार का, असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत.

शिवसेनेच्या सत्ताकाळात ठेवी वाढल्या

मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना पालिकेच्या ठेवी वाढल्या. 25 वर्षांच्या शिवसेनेच्या सत्ताकाळात ठेवी तब्बल 92 हजार कोटींवर गेल्या.

2021 मध्ये 91,690 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. अलीकडच्या काळात त्यातून 8 हजार कोटी रुपये काढण्यात आले होते. नुकत्याच सादर झालेल्या अहवालानुसार, 1 मे 2026 रोजी  मुदत ठेवी सुमारे 77,310 कोटी होत्या.

मे महिन्यात सुमारे 8,840 कोटींची नवी गुंतवणूक करण्यात आली. त्याच काळात सुमारे 6,840 कोटींच्या ठेवी मॅच्युअर्ड झाल्या. नव्या गुंतवणुकीसह हा आकडा 1,994 कोटी झाला. यामुळे 31 मे 2026 रोजी एकूण मुदत ठेवी सुमारे 79,304 कोटी झाल्या.

मात्र आता 2021 ते 2026 या कालावधीत मिळणारे व्याज लक्षात घेता ठेवींमध्ये 30 हजार कोटींची वाढ होऊन एकूण ठेवी सुमारे 1 लाख कोटींच्या घरात असायला हव्यात, मग फक्त 79 हजार 304 कोटी रकमेच्या ठेवी का दिसत आहेत, असा सवाल उपस्थित  होत आहे.

Comments are closed.