कुलाबा पोलिसांची ‘तत्परता’! 48 वर्षांपूर्वी महिलेवर हल्ला, चंद्रशेखर कालेकरांना आज अटक
मुंबई : सत्य कधीही लपत नाही, जरा उशीर होतो पण न्याय हा मिळतोच… कायद्याचे हात मोठे आहेत, त्यातून कुणीच सुटू शकत नाहीत… असे एक ना अनेक डायलॉग आपण नेहमीच ऐकतो. पण न्यायाला उशीर उशीर म्हणजे किती उशीर व्हावा याला मात्र कोणतीही मर्यादा उरली नाही. याला पुष्टी देणारा प्रकार नुकताच घडल्याचं समोर आलं. दापोलीत राहणारे 71 वर्षीय चंद्रशेखर मधुकर कालेकर यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की 48 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात कुलाबा पोलीस त्यांच्या दारावर येतील आणि त्यांना अटक करतील. अवघ्या महाराष्ट्रात केवळ एकच चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाची व्यक्ती आहे आणि नेमक्या याच नावामुळे चंद्रशेखर कालेकर हे सध्या अडचणीत सापडले आहेत.
त्याचं असं झालं की दोन दिवसांपूर्वी अचानक स्थानिक पोलीस घेऊन कुलाबा पोलीस कालेकरांच्या दापोलीतील घरी धडकले आणि एकाएक 48 वर्षांपूर्वीचा इतिहास ताजा झाला.
वर्ष होत 1977, कालेकरांवर आरोप होता की महिलेशी वादविवाद झाला असता रागाच्या भरात त्यांनी महिलेवर चाकूने वार केले. याप्रकरणी महिलेच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा. दं. वि. कलम 307 अंतर्गत त्यांना अटक झाली खरी, मात्र एका काळानंतर त्यांनी कोर्टाच्या तारखांना जाणंच सोडलं. अखेर मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं.
कोलाबा पोलिस प्रकरण: पोलिसांनी सगळीकडे शोधाशोध केली
फरार घोषित करताच कुलाबा पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. पण ते राहत असलेली लालबाग मधील हाजी कासम चाळ तोवर अस्तित्वात नसल्याने पोलिसांची अडचण होऊन बसली. त्यात तेव्हा मोबाईल देखील नव्हते. त्यामुळे त्यांचं लोकेशन मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता. पोलिसांनी लालबागच काय तर सांताक्रूझ, माहीम, गोरेगाव आणि बदलापूर सगळीकडे त्यांचा शोध घेतला पण हाती काहीच लागलं नाही.
निवडणूक कमिशन मतदार यादी: निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर एकच नाव सापडलं
हाती काहीच लागत नसल्याचं बघता पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी निवडणूक आयोगाचं पोर्टल आणि आरटीओ विभागाच्या पोर्टलवर चंद्रशेखर मधुकर कालेकर नाव सर्च केलं. निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर केवळ एकच चंद्रशेखर मधुकर कालेकर पोलिसांना सापडले, ते होते रत्नागिरीच्या दापोलीत रहाणारे. पण इथे देखील पत्त्याची अडचण, हा पत्ता काही पोलिसांना सापडत नव्हता.
चंद्रशेखर मधुकर कलेकर प्रकरण: जुना फोटो मिळवला अन् खातरजमा
अखेर मुंबई पोलिसांनी दापोली पोलीस ठाण गाठलं, इथे त्यांना चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाच्या गृहस्थांवर 2015 सालचा अपघाताचा गुन्हा असल्याच समजलं. एवढंच नव्हे तर त्यांचा वाहनचालक परवाना देखील मिळाला, ज्यावर त्यांचा फोटो होता.
पोलिसांनी हा फोटो लालबाग येथील रहिवाशांना दाखवला आणि कालेकरांच्या समवयस्क वयाच्या लोकांनी हे तेच चंद्रशेखर मधुकर कालेकर असल्याचा दुजोरा दिला. याच चंद्रशेखर कालेकरांचा कुलाबा पोलीस मागील 48 वर्षांपासून शोध घेत होते.
चंद्रशेखर कलेकर प्रकरण: कालेकरांना न्यायालयीन कोठडी
आता मात्र जराही वेळ न दवडता स्थानिक पोलिसांसोबत कुलाबा पोलीस कालेकरांच्या घरी धडकले. पोलीस आल्याचं पाहताच कालेकरांना देखील धक्काच बसला. चौकशीत कालेकरांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती कुलाबा पोलिसांनी दिली आहे. अटक करून त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.