ओंकार शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात चक्रावणारा दावा, म्हणाले, मालाड हत्याप्रकरणात ट्विस्ट?
मालाड रेल्वे स्टेशन हत्या: मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या महाविद्यालयातील प्राध्यापकाची पोटात धारदार शस्त्र खुपसून हत्या करण्यात आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) या तरुणाला अटक केली होती. त्याला रविवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ओंकार शिंदे (Onkar Shinde) याच्या वकिलांनी काही सनसनाटी दावे केले. (Mumbai crime news)
आलोक सिंह याच्यासोबत माझे अशील ओंकार शिंदे यांचे भांडण झाले होते. दोघांमध्ये वाद झाला होता. पण आलोक सिंह यांना ठार मारण्याचा ओंकारचा कोणताही हेतू नव्हता. तो पळून जाण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्मवरुन निघून गेला नाही. आलोक सिंह याचे मित्र त्याच्यासोबत होते. ते ओंकारला मारायला येत होते म्हणून तो पळून गेला, असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रोज हजारो वेठबिगार जात असतात, कडिया जात असतात. हे सगळे त्यांच्यासोबत साहित्य बाळगतात. आलोक सिंह यांना कोणाचं काही लागून इजा झाली असेल तर माहिती नाही. फिर्यादीने आलोक सिंह याच्या पोटात चाकू मारल्याचे म्हटले नाही. त्यामुळे माझ्या पक्षकाराने ही हत्या केलेली नाही. लोकल ट्रेनमधून रोज हजारो लोक जातात, कोणी चिरडले गेले किंवा काहीही झाले तर तुम्ही हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल ओंकार शिंदे याच्या वकिलांनी विचारला. मात्र, न्यायालयाने ओंकार शिंदे याला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तत्पूर्वी सरकारी वकिलांनी ओंकार शिंदे याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. गुन्ह्यातील हत्यार शोधणे बाकी आहे. आरोपी आणि मयत एकाच परिसरात राहतात. त्यामुळे त्यांच्यात काही पूर्वीचे वाद आहेत का हे तपासायचे आहेत, असे सरकारी वकिलांनी म्हटले.
Mumbai news: पोलिसांनी ओंकार शिंदेला कसं पकडलं?
आलोक सिंह यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसल्यानंतर ओंकार शिंदे ट्रेनमधून उतरुन पळून गेला होता. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा तपास सुरु केला होता. तेव्हा पोलिसांना ओंकार शिंदे रोज लोकल ट्रेनने मालाड ते चर्नी रोड प्रवास करत असल्याचे दिसून आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मालाड स्थानकावर सापळा रचला आणि आज ओंकार शिंदे कामावर जाण्यासाठी पुन्हा स्टेशनवर आला तेव्हा त्याला ताब्यात घेतले.
काल संध्याकाळी बोरिवली लोकलमधून येत असताना मालाड स्थानकावर उतरत असताना ओमकार शिंदे यांच्यासमोर उभे असलेल्या आलोक सिंह यांच्याशी त्याचा वाद झाला. आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी ओंकार शिंदे ढकलत होता, पुढे महिला उभी असल्याने आलोक सिंग यांनी धक्का मारू नको, असे म्हटले. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि उतरतानाच खिशात असलेल्या चिमट्याने आरोपीने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला. सीसीटीव्हीतील दृश्यानुसार ओंकार शिंदे हा फक्त एकच वार करुन पळून गेला. मात्र, चिमटा टोकदार असल्याने आलोक यांना गंभीर इजा झाली आणि झालेल्या रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.