डेटिंग अॅपवरुन हॉटेलात बोलवायचे, ड्रिंक्सचं बिल हजारो; 6 महिलांसह 22 जणांची टोळी गजाआड
मुंबई : अलिकडच्या तरुणाईला ऑनलाईन अॅपच्या (App) माध्यमातून फसवणूक करत पैसे उकळण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अकोल्यात ‘गे डेटिंग’ अॅपवरुन ओळख, मैत्री आणि त्यानंतर फसवणुकीचा भयावह सापळा रचण्यात आला होता. अकोल्यात घडलेली ही घटना समलिंगी व्यक्तींविरोधातील फसवणुकीचे नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर आणणारा होता. बँकेत कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला डेटिंग अॅपवरून फसवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ब्लॅकमेल करण्यात आले आणि त्याच्याकडून तब्बल 80 हजार रुपये उकळण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी (Police) आरोपींना अटकही केली होती. आता, डेटिंग अॅपवरुन फसवणक करणाऱ्या टोळीलाच पोलिसांनी अटक केली आहे.
डेटिंग अॅप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 22 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये, 6 महिलांचाही समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे.
फिर्यादी तरुणाची TINDER अॅपवरून ओळख करून बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. ड्रिंक्सचा बहाणा करत त्याच्याकडून 14,700 रुपये QR कोडद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकून दिल्ली, गाजियाबाद आणि उत्तर प्रदेश येथून आलेल्या 15 पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले. ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अॅप्सवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत असे. भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळले जात होते. पोलिसांनी या कारवाईत 27 मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, स्वाईप मशीन असा 3.74 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.