मुंबई पालिकेसाठी भाजपनं कंबर कसली! 150 जागा लढवण्याचं लक्ष्य, शिंदेच्या शिवसेनेला किती जागा?
मुंबई महानगरपालिका: मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) भाजपनं (BJP) अधिकाधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असली तरी भाजपकडून 150 जागांचे लक्ष्य यंदाच्या महापालिकेत ठेवण्यात आले आहे. यंदा, महायुतीत भाजप मुंबई महापालिका लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या अनौपचारिक गप्पा दरम्यान स्पष्ट केलं आहे. मात्र, अधिकाधिक जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. सोबतच, उपमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 दरम्यान जागा दिल्या जाऊ शकतात अशी भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजप नेते जाहीररित्या बोलत नसले तरी कार्यकर्त्यांना भाजपने अधिक जागा लढवाव्यात असं वाटत असल्याचं नेत्यांकडून सांगितले जात आहे.
केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी सुरु झाली आहे. दरम्यान, 150 जागा लढण्याचे टार्गेट डोळ्यासमोर असलेल्या भाजपची नेमकी रणनीती काय आहे याबाबतची माहिती पाहुयात.
सेनेच्या ‘किल्ल्यात’, भाजप १५० पार!
शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून 65 ते 75 जागा सोडल्या जाणार, आहेत. सोबतच उमेदवार निवडीची जबाबदारी घेतली जाणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास सेनेला फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशात भाजपचे अधिकाधिक उमेदवार उपनगरात उतरवले जाणार आहेत. सोबतच, भाजप आमदार असलेल्या मुंबईतील मतदारसंघात देखील संपूर्ण जोर भाजपकडून लावला जाणार आहे. ज्यामध्ये कुलाबा, मलबार हिल, सायन, वडाळा या मतदारसंघाचा समावेश असणार आहे.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जिंकून येणे हेच निकष डोळ्यासमोर ठेवत जागावाटप होणार आहे. ज्या जागांवर अधिक पेच त्यासंदर्भात महायुतीचे नेते एकत्रित येत पेच सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. उमेदवारांची अदलाबदली महायुतीत विधानसभेत दिसली होती, तशीच रणनीती काही जागांवर होण्याची शक्यता आहे.
ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता
महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याचा देखील प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतो. दोन्ही भावांना मुंबईत फायदा होऊ नये यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जाणार आहे. दरम्यान, भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावरुन महायुतीची खिल्ली उडवली आहे. तर अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना भाजपचं ऐकावं लागणार अशी बोचरी टीका केली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून 100 हून अधिक जागा लढण्याचा निर्धार
एकीकडे भाजपनं 150 जागांवर तयारी सुरु केली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून 100 हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केला आहे. सोबतच, शिंदेंकडून नुकताच दिल्ली दौरा करण्यात आला आहे. ज्यात समसमान वाटप मुंबई महापालिकेसाठी व्हावं अशी मागणी शिवसेनेच्या गोटातून होताना दिसत आहे. अशातच दिवाळीचे फटाके जरी फुटले असले तरी आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे. अशात, जागावाटपा आधीच महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेदाचे फटाके फुटताना दिसू शकतात. अशात, हा पेच महायुती कशी सोडवणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.