प्रभादेवीची जुई नारकर सायकल मास्टर; कस्टम पॉइंटच्या ट्रकवर ‘हॅट्ट्रिक’ची धूम, पुरुषांमध्ये अलिबागचा प्रांजल पाटील विजेता
पॅडलचा वेग, विजयाची जिद्द आणि इतिहास रचण्याची संधी… या तिन्हींचा भन्नाट संगम प्रभादेवीच्या कस्टम पॉइंट सायकल शर्यतीत पाहायला मिळाला. अलिबागचा प्रांजल पाटील आणि प्रभादेवीची जुई नारकर यांनी पुरुष आणि महिला मुख्य गटात सलग तिसऱ्यांदा बाजी मारत सायकल मास्टर जेतेपदाची अनोखी हॅट्ट्रिक साजरी केली. कस्टम पॉइंटच्या तब्बल 46 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा पराक्रम घडला आणि तोही एकाच वेळी दोन सायकलपटूंनी हॅट्ट्रिक साधत अनोखा योगायोग साधला
स्वातंत्र्यदिनी सातत्याने शर्यतीचे आयोजन करणाऱ्या कस्टम पॉइंट वेल्फेअर सोसायटीच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यंदा 200 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. मुंबईसह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अलिबागमधून आलेल्या सायकलपटूंनी ट्रकवर जोरदार चुरस निर्माण केली.
पुरुषांच्या मुख्य गटात प्रांजल पाटीलने आपला दबदबा कायम ठेवत अव्वल स्थान पटकावले. देवर्षी पाटील दुसरा, तर बल्या हिरेमठ तिसरा ठरला. महिला गटात जुई नारकरने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हॅट्ट्रिक साधली. श्रावणी घोडेस्वार आणि ऐश्वर्या दुधाळ यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले
लिटिल सायकल मास्टर गटात आर्यन जाधव विजेता ठरला. दिग्विजय नवले आणि दर्श चुणेकर यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. ज्युनिअर सायकल मास्टर गटात आर्यन लोहारने बाजी मारली, सार्थक प्रसाद आणि गौरव ढवळे यांनी त्याला चांगले आव्हान दिले. दहा वर्षांखालील गटात स्वजस परब अव्वल ठरला. गिअरच्या खुल्या गटात श्रीकांत खडतर प्रथम, वेदांत पानसरे द्वितीय आणि जिविन मार्लेशा तृतीय आले. 40 वर्षांवरील वरिष्ठ गटात किरण पवार यांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आमदार महेश सावंत, नगरसेवक यशवंत किल्लेदार, शाखाप्रमुख संजय भगत, रेखा देवकर, संस्थेचे अध्यक्ष योगेश मानकामे आणि सचिव हरीष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.
Comments are closed.