'ULPGM-V3' क्षेपणास्त्राची चाचणी

डीआरडीओकडून आणखी एक मोठी कामगिरी

वृत्तसंस्था/ कुर्नूल

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) मानवरहित हवाई वाहन अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्राच्या (‘यूएलपीजीएम-व्ही3’) अंतिम आवृत्तीच्या प्रणाली विकास चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या चाचण्या आंध्र प्रदेशातील कुर्नूलजवळ असलेल्या डीआरडीओच्या चाचणी केंद्रावर घेण्यात आल्या. क्षेपणास्त्राची चाचणी हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत अशा दोन्ही पद्धतींमध्ये घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजिस यांच्याशी भागीदारी केली आहे. तसेच बेंगळूरस्थित ‘न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज’च्या यूएव्हीसोबत याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशातील कुर्नूल येथील चाचणी केंद्रावर ‘यूएव्ही लाँच्ड प्रिसिजन गायडेड मिसाइल’च्या अंतिम चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा रविवारी डीआरडीओकडून करण्यात आली. आता ‘यूएलपीजीएम-व्ही3’ हे क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. ‘यूएलपीजीएम-व्ही3’ क्षेपणास्त्रप्रणाली शत्रूचे रणगाडे, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि इतर हवाई लक्ष्यांचा अचूक वेध घेऊ शकते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योग क्षेत्रातील सर्व भागीदारांचे अभिनंदन करत ही चाचणी संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी एक धोरणात्मक मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे.

Comments are closed.