Mumbai News – कुर्ल्यात गँगवार, भररस्त्यात गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला; एकाचा मृत्यू
मुंबईतील कुर्ला परिसरात गँगवार उफाळून आला. भररस्त्यात सराईत गुन्हेगाराला आधी गोळ्या घालून मग धारदार शस्त्राने वार करून संपवल्याची घटना घडली. बाबा यलप्पा पवार असे हत्या केलेल्या गुंडाचे नाव आहे. कुर्ला पश्चिमेकडील हलाओ पूल परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मुंबई तकने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास बाबा पवार या गुंडावर भररस्त्यात अचानक टोळक्याने गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. या हल्ल्यानंतर पवार रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्याला तात्काळ जवळच्या भाभा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उरचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बाबा पवारवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Comments are closed.