Mega Block – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर सीएसएमटीहून पनवेल, गोरेगाव लोकल सेवा बंद राहणार

उपनगरीय मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालदुरुस्तीच्या कामाकरीता मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत CSMT मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील; त्यानंतर मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

ब्लॉकच्या कालावधीत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील सर्व गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – सीएसएमटी दरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.

ब्लॉक कालावधीत सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत सीएसएमटी येथून वाशी / बेलापूर / पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या, तसेच सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 या वेळेत सीएसएमटी येथून वांद्रे / गोरेगावच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात येतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा, तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान दर 20 मिनिटांच्या अंतराने विशेष गाड्या धावतील.

ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची मुभा असेल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षितता यांसाठी हा नियोजित मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Comments are closed.