कफ परेड येथे दुर्घटना, वेगाने घेतला दोघा भावांचा बळी
बुधवारी पहाटेच्या सुमारास कफ परेड येथे वेगाने दोघा सख्ख्या भावांचा बळी घेतला. भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी एका इमारतीच्या संरक्षक भिंतीला धडकली. यात दुचाकीवरील दोघा भावांचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गणेशमूर्ती नगरावर शोककळा पसरली आहे.
सुमित वाल्मीकी (22) आणि संजू वाल्मीकी (15) अशी त्या भावांची नावे आहेत. गणेशमूर्ती नगरात राहणारे हे दोघे सख्खे भाऊ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टीव्हीएस रायडर या दुचाकीवरून जात होते. दुचाकी वेगात असताना सुमितचे नियंत्रण सुटले. परिणामी भरधाव दुचाकी नानाभाई मुसा मार्गावरील गंगोत्री इमारतीच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळल्याने दोघे भाऊ रस्त्यावर आपटले. दोघांच्या चेहरा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी दोघांनाही नागरिकांनी तत्काळ गोपुळदास तेजपाल इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. दोघा भावांचा असा करुण अंत झाल्याने गणेशमूर्ती नगरावर शोककळा पसरली आहे.
Comments are closed.