Police Threats Students : “पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!”; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
मुंबई: नीट (NEET) पेपर फुटीविरोधात मुंबईत विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांच्या गाडीतच अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सध्याच्या नियुक्तीवरून हटवले असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
Police Threats Students : काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
‘दहिसरकर’ या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गाडीत काही आंदोलनकर्ते विद्यार्थी बसलेले दिसत आहेत. विद्यार्थी शांत न बसल्याने पोलीस गाडीतील एक कर्मचारी त्यांना थेट धमकी देताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. “पुन्हा आंदोलन करताना दिसलात तर ५० ग्रॅम पावडर (ड्रग्स) खिशात टाकू आणि अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून आत टाकू. पुन्हा आलात तर माझ्यासारखं वाईट कोणी असणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत हा पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना धमकावताना ऐकू येत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वसामान्यांसह राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांविषयी नागरिकांच्या मनात नेहमीच विश्वास आणि आदर राहिला आहे, मात्र अशा प्रकारची भाषा आणि वागणूक लोकशाही व्यवस्थेला व कायद्याच्या राज्याला गंभीर प्रश्न विचारणारी आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली जात असेल, तर ही लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला धक्का देणारी बाब ठरत आहे.
Police Threats Students : व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना गाडीमध्ये बसवले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये धमकावले जात आहे. पोलिस कर्मचारी म्हणतो आहे की, फिर मेरे जैसा कोई बेकार आदमी नही, वापीस इधर किधर मिला तो 50-50 ग्रॅम पावडर डाल देगा जेब मैं, फिर गया तू, तो जामीन!
Police Threats Students : मुंबई पोलिसांची कारवाई आणि स्पष्टीकरण
या कथित व्हिडिओची मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. पोलिसांकडून या व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी केली जात असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सत्यता पडताळणीचा अहवाल येईपर्यंत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या सध्याच्या नियुक्तीवरून हटवण्यात आले आहे. चौकशीनंतर दोषींवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुंबई पोलिसांनी दिले आहे.
Police Threats Students : या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. हर्षवर्धवन सपकाळ, नसीम खान, भाई जगताप हे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेणार आहेत, या प्रकरणी माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जो विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू आहे. तरुणाई रस्त्यावर उतरून आली आहे, असे असताना पोलिसांचं हे वागणं योग्य नाही. गुंडागर्दी ऐवजी आता पोलिस गर्दी सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. हे पोलिस महासंचालक यांना सांगितलं, अंमला पदार्थांचा व्यापार पोलिस करत आहेत, हे या व्हिडीओच्या माध्यमातून हे समोर येत आहे. पोलिस सांगत आहे की, या पोलिसाची चौकशी सुरू झाली आहे. आम्ही त्यांना पोलिस राज कसं सुरु आहे याची डिटेल माहिती दिली. सर्व पोलिस अधीक्षक आणि अधिकारी यांची उद्या बैठक बोलावली आहे, गृह विभागाचा कारभार पांडू हवालदार चालवत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Comments are closed.