मुंबई-पुणे प्रवासाची ‘लिंक मिसिंग’, वाहनांच्या 24 किलोमीटर रांगा! रणरणत्या उन्हात अन्नपाण्यावाचून लोकांचे हाल

प्रोपेलीन गॅसचा टँकर उलटल्याने दोन दिवस एक्सप्रेस वे ठप्प झाल्याचा अॅक्शन रिप्ले आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घडला. महाराष्ट्र दिनामुळे सलग आलेल्या सुट्ट्यांची मौज करण्यासाठी बाहेर पडलेले मुंबई, ठाणेकर आज एक्प्रेस वेवर वाहतूक कोंडीत अडकले. एकाच वेळी एक्सप्रेस वेवर आलेल्या हजारो गाड्या आणि सरकारने मिसिंग लिंकच्या उद्घाटनाचा घातलेला घाट याचा मोठा फटका वाहतुकीला बसला. प्रवासाची ‘लिंक मिसिंग’ झाली. आधी मुंगीच्या पावलाने चालणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यातच इंजिन गरम होऊन असंख्य गाड्या घाटातच बंद पडल्या. उन्हाचा तडाखा, त्यात तासन्तास घाटातच अडकून पडावे लागल्याने मुले, महिला आणि वृद्धांचे अन्नपाण्यावाचून प्रचंड हाल झाले. खालापूर टोलनाक्यापासून झालेली वाहतूककोंडी बोरघाटापर्यंत पोहोचली. वाहनांच्या 24 किलोमीटर रांगा लागल्या. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी सरकारच्या नावाने शिमगा केला.

महाराष्ट्र दिनाची सुट्टी त्याला लागून आलेला विकेण्ड यामुळे मुंबई, ठाणेकर मोठ्या संख्येने आज सकाळीच पर्यटनाला निघाले. एकाच वेळी हजारो गाड्या एक्सप्रेस वेवर आल्या. त्यामुळे तुफान वाहतूक कोंडी झाली. त्यातच घाट सेक्शनमुळे चालकांना हाफ क्लचवर गाड्या चालवाव्या लागल्याने इंजिन गरम होऊन अनेक गाड्या वाटेतच बंद पडल्या. या गाड्यांनी वाट अडवल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. खालापूर टोल नाक्यापासून ते थेट पुण्यापर्यंत वाहतुकीचा जांगडगुत्ता झाला.

डोक्यावर आग ओकणारा सूर्य, बंद पडलेल्या गाड्या, ट्रफिकची अनेक किलोमीटरची रांग, संपलेले पिण्याचे पाणी अशा चक्रव्यूहात हजारो प्रवाशी अडकले. यात महिला, मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले. अनेक जण दुसऱ्या गाडी चालकांकडे पिण्याचे पाणी मिळेल का, अशी विचारणा करत होते. बंद पडलेल्या गाड्यांतील एसीही बंद असल्यामुळे त्यांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला होता.

सुप्रिया सुळे दोन तास ट्रफिकमध्ये अडकल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा या ट्रफिकमध्ये तब्बल दोन तास अडकून पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना आज महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही हजर राहता आले नाही. त्याचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. सकाळी ठाण्याहून निघालो, आता दोन तास गाडीत बसून आहोत. आता आमची आजूबाजूच्या लोकांसोबत मैत्रीही झाली आहे. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता आम्ही सर्वजण वाहतूककोंडीत अडकलो आहोत, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आसपास असलेली वाहनेही दाखवली. यावेळी त्या वाहनांमधील प्रवाशांनीही “महाराष्ट्र दिन स्पेशल’’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्या व्हिडीओत आपल्या भावना व्यक्त केल्या.

25 मिनिटांचा ब्लॉक

या अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसोबत वाहतूक पोलिसांचीही दमछाक झाली. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक वेळी तब्बल 25 मिनिटांचा ब्लॉक पोलिसांना घ्यावा लागला. कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश सरकारने दिले.

अन्न मालाचे पार्किंग फुल्ल

वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी आपल्या गाड्या फूड मॉल आणि इतर हॉटेलच्या आवारात वळवल्या. त्यामुळे फूड मॉल आणि इतर हॉटेलांचे पार्किंगही फुल्ल झाले. तेथील वाहतूक नियंत्रित करणेही सुरक्षारक्षकांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

प्रवासी सरकारवर संतापले

सुट्ट्यांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असताना सरकारने आज दुपारी 1नंतर मिसिंग लिंकचे उद्घाटन का ठेवले? या मिसिंग लिंकच्या उद्घाटनासाठी एक मार्ग बंद करावा लागला. त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला. उद्घाटन करायचेच होते तर ते सकाळी का केले नाही? मिसिंग लिंकचे उद्घाटन करताना वाहतुकीचे नियोजनच ‘मिसिंग’ झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर ट्रफिक जॅममध्ये अडकलेल्या लोकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर केलेल्या भाषणादरम्यान माफी मागितली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या व्हिडीओचाही उल्लेख केला. आज त्या शेवटच्या या ट्रफिकमध्ये अडकल्या असून यापुढे मुंबई-पुणे प्रवास करताना मिसिंग लिंकमुळे त्या कधीच ट्रफिकमध्ये अडकणार नाहीत, असे ते म्हणाले.

बंदी असतानाही पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर अवजड वाहनांची वाहतूक

मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थ, स्फोटके किंवा धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णपणे बंदी असेल असे सरकारने जाहीर केले होते. अवजड वाहनांना पुढील सहा महिने तरी हा मार्ग वापरता येणार नाही. तसे स्पष्ट निर्देश सरकारने दिले होते. परंतु ते पायदळी तुडवून आज पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवरून अवजड वाहने ताशी 100 किलोमीटरच्या स्पीडने ये-जा करताना दिसून आली.

कोकणच्या मार्गावरही कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावरही आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माणगावच्या बाजारपेठेत मोठी कोंडी झाली. खेडमध्ये भरणे नाका ते वेरळ दरम्यान वाहतूक ठप्प होती. इंदापूर ते तळा, इंदापूर ते निजामपूर, होडगाव, खरवली रोड रस्ता ते सुरव, मोर्बा धरण, दहिवली, गोरेगाव, खरवली फाटा अशा पर्यायी मार्गांवरदेखील ट्रफिकजाम झाले.

Comments are closed.