मुंबईत 1745 कोटींचे 349 किलो कोकेन जप्त!
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक हाती घेऊन 349 किलो कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 1 हजार 745 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एनसीबीचे पथक हे ऑपेरेशन यशस्वी करण्यासाठी माहिती गोळा करण्याचे काम करत होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून कारवाईची माहिती दिली.
अमली पदार्थ तस्कराचे कंबरडे मोडण्याचे काम एनसीबी करत आहे. कोकेन तस्करीबाबत एनसीबी युनिटला काही माहिती मिळत होती. गेल्या सहा महिन्यांपासून एनसीबी युनिटने माहिती गोळा केली. हाय इम्पॅक्ट ऑपरेशन दरम्यान एनसीबीने कळंबोली-भिवंडी कॉरिडॉर (नवी मुंबई-ठाणे क्षेत्र) येथे गोदामात छापे मारले. कारवाई दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. एनसीबीने कारवाई करून 349 किलो कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 1 हजार 745 कोटी रुपये इतकी आहे.
तस्कराने केला क्रिकेट पॅड आणि ग्लोव्हजचा वापर
पहिल्या टप्प्यात एनसीबीच्या अधिकाऱ्याने कळंबोली येथील केडब्ल्यूसी या वेअरहौसिंग कॉम्प्लेक्सजवळ मुंबई पासिंग असलेल्या एका गाडीला थांबवले. त्या गाडीची तपासणी केली. त्या गाडीतून 136 पॅकेट कोकेन जप्त केले. त्या प्रत्येक पाकिटात 1 किलो कोकेन होते. तस्कराने कोकेन तस्करीसाठी क्रिकेट पॅड आणि ग्लोव्हजचा वापर केला होता. एनसीबीने एका तस्कराला जागीच अटक केली. त्याच्या चौकशीनंतर एनसीबीचे पथक भिंवडी येथे गेले. तेथील रेहनल गावाजवळील परिसरातील एका गोदामात छापा मारला. छापा मारून आणखी 213 किलो कोकेन जप्त केले.
अमित शहा यांच्याकडून एनसीबीचे कौतुक
मुंबईत अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मोठे रॅकेट पकडले आहे. यात 1,745 कोटी रुपयांचे 349 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ‘टॉप टू बॉटम’ कारवाईचे हे उदाहरण आहे. या यशस्वी कारवाईसाठी ‘एनसीबी’चे अभिनंदन करतो, अशी पोस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वर केली असून ‘एनसीबी’चे कौतुक केले आहे.
- जप्त केलेले कोकेन काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानात एका मशीनच्या द्वारे आणले गेले होते. त्या मशीनमध्ये छोटे कप्पे करून त्यात कोकेन लपवले होते.
- संशय येऊ नये म्हणून प्रत्येक पाकिटावर 9 प्रकारच्या पॉलिथिन पिशव्या लावल्या होत्या.
- कोकेन तस्करीचा सूत्रधार, अर्थपुरवठादार आणि ज्यांच्यापर्यंत हे कोकेन पोहचवणार होते, त्याचा शोध एनसीबी घेत आहे.
- दरवर्षी 200 ते 300 किलो कोकेन जप्त केले जाते. यंदाच्या वर्षातील एनसीबी युनिटची ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
Comments are closed.