IPL 2026 – दिल्लीचे राजस्थानवर राज्य, सहाव्या स्थानावर झेप
दिल्लीने राजस्थानवर राज्य करत विजयाचा चौकार लगावला. राजस्थानवर दिल्लीने सात विकेट्स राखून मात केली आणि गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले. राजस्थानचा कर्णधार रायन परागने 50 चेंडूंत 8 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 90 धावांची खेळी साकारली. त्यामुळे राजस्थानच्या संघाला 225 धावा करता आल्या होत्या. पण दिल्लीच्या संघाने 110 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. के. एल. राहुलने 70 तर पथुम निसांकाने 62 धावा केल्या.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सची सुरुवात आश्वासक झाली नाही. वैभव सूर्यवंशी 4, तर यशस्वी जयस्वाल हा 6 धावांवर बाद झाला. राजस्थानची 2 बाद 12 अशी अवस्था असताना रायन पराग मैदानात आणि त्याने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत संघाला फक्त सावरले नाही, तर मोठी धावसंख्याही उभारून दिली. रायनचे शतक यावेळी 10 धावांनी हुकले. रायन बाद झाल्यावर डोनोव्हन फरेराने फक्त 14 चेंडूंत 6 षटकार आणि दोन चौकारांच्या जोरावर 47 धावांची तुफानी खेळी साकारल्यामुळेच राजस्थानला 200 धावांचा पल्ला ओलांडता आला. दिल्लीच्या संघाकडून यावेळी मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट मिळवले.
राजस्थानच्या 225 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या राहुल आणि पथुम या जोडीने दिमाखदार शतकी सलामी दिली. या शतकी सलामीच्या जोरावर दिल्लीचा विजय सुकर झाला. पथुमच्या रूपात दिल्लीला पहिला धक्का बसला. पण त्यानंतर राहुलने 177 धावांपर्यंत संघाला मजल मारून दिली आणि विजयात सिंहाचा वाटा उचलला.
Comments are closed.