टेनिस ‘समुराई’चा निरोप! जपानी टेनिसस्टार निशिकोरीचा टेनिसला अलविदा

जपानचा टेनिस समुराई आणि आशियाचा अभिमान केई निशिकोरीने अखेर रॅकेट खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रॅण्डस्लॅम फायनल गाठणारा पहिला आशियाई पुरुष आणि रिओ ऑलिम्पिक 2016 चा कांस्यपदक विजेता असलेला 36 वर्षीय निशिकोरी या हंगामाच्या अखेरीस व्यावसायिक टेनिसला अलविदा करणार आहे. त्याने सोशल मीडियावर भावनिक संदेश देत आपला हा निर्णय जाहीर केला.
लहानपणापासून टेनिसचं स्वप्न डोळय़ात ठेवून कोर्ट गाजवणाऱ्या निशिकोरीने केवळ पाचव्या वर्षी रॅकेट हातात घेतलं आणि 13 व्या वर्षी अमेरिकेत जाऊन आपली कारकीर्द घडवली. 2008 मध्ये डेलरे बीच ओपन जिंकत त्याने विजयी सुरुवात केली. 2014 मध्ये अमेरिकन ओपनमध्ये नोव्हाक जोकोविचला हरवत फायनल गाठणारा तो पहिला जपानी ठरला, जरी अंतिम सामन्यात मारिन सिलिचकडून त्याला पराभव पत्करावा लागला. रिओमध्ये राफेल नदालला हरवत त्याने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला.
जखमांनी मात्र त्याच्या स्वप्नांना वारंवार धक्का दिला. तरीही 451 विजय आणि 12 किताबांसह त्याने टॉप-10 मध्ये स्थान मिळवत स्वतःची छाप उमटवली. ‘मी सर्व काही दिलं,’ असं सांगत निशिकोरीने आपल्या प्रवासाचा अभिमान व्यक्त केला.
Comments are closed.