शेवटच्या चढाईत आयएसपीएल उपांत्य फेरीत; युपी योद्धा, दक्षिण-मध्य रेल्वे, युनियन बँकही अंतिम चौघांत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

(छाया – सचिन वैद्य)

बंडय़ा मारुती सेवा मंडळाच्या देखण्या अन् रोमहर्षक स्पर्धा आयोजनाने कबड्डीप्रेमींची मनं जिंकली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अखिल हिंदुस्थानी कबड्डी स्पर्धेत हृदयाची धडधड वाढवणाऱ्या चौथ्या दिवशी आयएसपीएलने जयपूर कब्सचा 43-41 तर दक्षिण-मध्य रेल्वेने हिंदुस्थानी नौदलाचा 44-43 असा पराभव करत उपांत्य फेरीत झेप घेतली. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी शनिवारी एकमेकांशी भिडतील. तसेच यूपी योद्धाने भारत पेट्रोलियमचा  54-36 असा तर युनियन बँकेने ओएनजीसीचा 58-42 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

आज कबड्डीच्या पंढरीत हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱ्या कबड्डी चाहत्यांना क्षणोक्षणी थराराचीच गळाभेट झाली. उपउपांत्यपूर्व सामन्यात जयपूर कब्सने तामीळनाडू क्लबचा 45-37 असा पाडाव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले, तर यूपी योद्धाने मुंबई बंदरकडून शेवटच्या क्षणी विजय 44-38 असा खेचून काढला. या विजयात गगन गौडाने केलेल्या तुफानी चढायांनी प्रेक्षक अवाप् झाले. याच गगनने भारत पेट्रोलियमच्या संरक्षकांना अक्षरशः उद्ध्वस्त केले. त्याच्या वेगवान आणि खोलवर चढायांचे पेट्रोलियमच्या एकाही खेळाडूकडे उत्तर नव्हते. त्याची प्रत्येक चढाई बीपीसीएलच्या पोटात गोळा आणत होती. अनिल जस्ताने आपल्या चढायांनी संघाला या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला. सामन्याची शेवटची पाच मिनिटे असताना गगनने एकाच चढाईत पाच खेळाडू बाद करण्याचाही पराक्रम केला. तो अशी कामगिरी करणारा स्पर्धेतील पहिलाच चढाईबहाद्दर ठरला. त्याने या सामन्यात आपली चांगलीच दहशत निर्माण केली. त्यानेच आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला.

नीरजने सामना फिरवला

तामीळनाडू क्लबला नमवल्यानंतर तासाभराच्या विश्रांतीने ताजेतवाने झालेल्या जयपूर कब्जने आयएसपीएलविरुद्धही जोरदार खेळ केला. पहिल्या सत्रात दोघेही एकमेकांशी तुल्यबळ लढले तरीही जयपूरकडे 22-18 अशी 4 गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर ही आघाडी त्यांनी थेट 33-20 पर्यंत वाढवत सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तेव्हा 13 गुणांची पिछाडी पाहून जराही न डगमगता आयएसपीएलच्या नीरज मिसाळने एकापेक्षा एक चढाया करत संघाला पुन्हा सामन्यात आणले. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकेका गुणासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. सामना संपायला दहा सेपंद असताना झालेल्या शेवटच्या चढाईत जयपूरच्या खेळाडूने आयएसपीएलच्या चार खेळाडूंना खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला आणि आयएसपीएलने अवघ्या दोन गुणांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Comments are closed.