मुंबई T20 लीग 2026 – श्रेयस अय्यर, आदित्य तरेची स्टंट; मुंबई फाल्कन्सचा पहिला विजय
टी-२० मुंबई लीग २०२६ मध्ये सोबो (SOBO) मुंबई फाल्कन्सने अखेर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. गुरुवारी (04 जून 2026) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चुरशीच्या सामन्यात, अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरे आणि श्रेयस अय्यरच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर फाल्कन्सने एमएससी मराठा रॉयल्सविरुद्ध ३ गडी राखून मात केली. मराठा रॉयल्सने दिलेले १५३ धावांचे आव्हान फाल्कन्सने १९.१ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमएससी मराठा रॉयल्सची सुरुवात खराब झाली. मात्र, कर्णधार सिद्धेश लाडसोबत सलामीला आलेल्या साहिल जाधवने ३० चेंडूंत ५२ धावांची धडाकेबाज खेळी करत डाव साभाळला. चिन्मय सुतार (२३) आणि अखेरच्या षटकांमध्ये अर्जुन दाणीने केलेल्या ३५ धावांच्या जोरावर रॉयल्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. मुंबई फाल्कन्सकडून गोलंदाजीत आकाश पारकर आणि डावखुरा फिरकीपटू यश डिचोलकर यांनी प्रत्येकी ३ बळी घेत रॉयल्सच्या धावसंख्येला ब्रेक लावला.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या मुंबई फाल्कन्सला आदित्य तरे (४२ धावा) आणि इशान मुलचंदानी (२९ धावा) यांनी ५७ धावांची झंझावाती सलामी दिली. त्यानंतर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून आलेल्या श्रेयस अय्यरने २४ चेंडूंत ३० धावा करत संघाची स्थिती मजबूत केली. श्रेयस बाद झाल्यानंतर फाल्कन्सचा डाव काहीसा घसरला आणि त्यांनी २१ धावांत ४ गडी गमावले. परंतु, गौतम वाघेलाने संयम राखत नाबाद २६ धावांची खेळी केली आणि ५ चेंडू राखून फाल्कन्सला विजय मिळवून दिला. मराठा रॉयल्सकडून मॅक्सवेल स्वामीनाथनने २४ धावांत २ बळी घेतले.
Comments are closed.